अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :केडगाव येथील शिवसेना नगरसेवक अमोल येवले यांना तीन कोटींची सुपारी घेतल्याचे सांगत खून करण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आकाश पवार (रा. गोपाळ गल्ली, केडगाव) याला ताब्यात घेतले.
दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, नगरसवेक येवले यांना तिघांकडून जिवे मारण्याची धमकी देत हॉटेलसमोर गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी अभिजीत अर्जुन कोतकर (वय 32, रा. कोतकर मळा, केडगाव) यांच्या फिर्यादीवरुन स्वतंत्र गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल आहे.
या गुन्ह्यात त्याला वर्ग करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. आकाश पवार याने येवले यांना फोन करून ‘मला तुझी सुपारी मिळाली असून, तुझा मर्डर करणार आहे’, असा दम दिला.
त्याचा भाऊ सचिन पवार याला फोन केला असता, त्यानेही आकाश याला तुझी 3 कोटींची सुपारी मिळाली आहे, असे तो मला बोलला आहे, अशी तक्रार येवले यांनी दिली होती.
कोतवाली पोलिसांनी याबाबत अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी आकाश पवार याला ताब्यात घेऊन चौकशी केली.
दारूच्या नशेत त्याने हा प्रकार केल्याचे समोर आल्यावर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांनी सांगितले.