अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : बापाचा खून करणाऱ्या मुलास पोलिसांनी केली अटक !

Ahmednagar Breaking : राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे गावात शेतजमीन नावावर करून देत नसल्याच्या कारणावरून काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत ८० वर्षीय वडिलांचा खून करणाऱ्या फरार आरोपी मुलास राहाता पोलिसांनी अस्तगाव फाटा येथे शुक्रवार दि. २८ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास सापळा रचून अटक केली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे गावात गणपत संभाजी कोळगे (वय ८० वर्ष) हे कोऱ्हाळे येथे राहात होते. जमीन नावावर करून देत नसल्याच्या कारणावरून आरोपी मुलगा अनिल (वय ५३) याने दि. २४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये काठीने व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

यात गणपत कोळगे यांचा मृत्यू झाला. यानंतर मुलगा अनिल फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस आरोपीच्या शोधात होते. अनिल कोळगे शुक्रवारी अस्तगाव फाटा येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस नाईक विनोद गंभीरे यांना मिळाली होती.

त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक सोपान काकड यांना सांगितली. त्यानंतर पोलीस नाईक विनोद गंभीरे व कॉन्स्टेबल संभाजी शिंदे यांनी आरोपी येणार असलेल्या अस्तगाव फाटा या ठिकाणी सापळा लावला. काही वेळात आरोपी तेथे पायी चालत आला. त्यास पोलिसांनी हटकले असता आरोपी पळू लागला; परंतु पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यास पोलीस स्टेशनला आणून संबंधित गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान काकड, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांच्यासह हेड कॉन्स्टेबल विशाल पंडरो, श्रीकांत नरोडे, विनोद गंभीरे व संभाजी शिंदे यांनी केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सोपानराव काकड करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts