Ahmednagar City News : रस्ता बाजू शुल्क वसुलीचे मासिक हप्ते न भरल्याने आयुक्त पंकज जावळे यांनी वसुलीचे काम करणाऱ्या संस्थेचा ठेका मंगळवारपासून (दि.६) रद्द केला आहे.
दरम्यान, कंपनीची बयाणा व अनामत रक्कम जप्त करण्यात आली असून १४ लाख ८६ हजार ७५४ रुपयांची वसूल पात्र रक्कम ७ दिवसात जमा करावी, अन्यथा मनपाचे अर्थिक नुकसान व फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल,
असा इशारा उपायुक्त सचिन बांगर यांनी नोटीसीद्वारे दिला आहे. महापालिका हद्दीतील रस्ताबाजू मांडणी फी व स्लॉटर फी वसुलीचे काम नांदेड येथील संस्थेला देण्यात आले होते. ४६.९० लाख रुपयांना संस्थेने हा ठेका घेतला होता.
करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार प्रत्येक महिन्याचा हप्ता दर महिन्याच्या पाच तारखेला आगाऊ जमा करण्याची तरतूद आहे. मात्र, संस्थेने मासिक हप्ते न भरल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली होती.
जानेवारी व फेब्रुवारी महिन्याची ७ लाख ८१ हजार ७१० रुपयांपैकी अवघे ३ लाख रुपये जमा केले. उर्वरित पावणे पाच लाख रुपये व मार्च महिन्याचे पावणे चार लाख रुपये संस्थेने भरले नव्हते.
वेळोवेळी पत्रव्यवहार करुनही प्रतिसाद न मिळाल्याने अंतिम नोटीस मार्केट विभागाने संस्थेला दिली होती. तरीही पैसे न भरल्याने करारनाम्यातील अटी व शर्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत ३१ मे अखेर २३ लाख ३८ हजार ७०० रुपये निश्चित करून ४ लाख ६९ हजार रुपयांची अनामत रक्कम व ४४ हजारांची बयाणा रक्कम मनपाने जप्त केली आहे.