Ahmednagar News : अहमदनगरमधून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या लोकसभा निवडणुकीचा काळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नगरच्या राजकीय वर्तुळात मोठी ऊबदार राजकीय लढत अन टोकदार संघर्ष बघायला मिळतं आहे. महायुतीच्या नेत्यांनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात केली आहे.
आज पासून शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात देखील झाली आहे. अशातच मात्र नगरच्या राजकारणातुन मोठी अपडेट समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यात समाविष्ट असणाऱ्या अहमदनगर काँग्रेस जिल्हा समन्वयक पदावर कार्यरत असणाऱ्या ज्ञानदेव वाफारे यांना निलंबित करण्यात आले आहे.
खरे तर या कथित घोटाळ्याप्रकरणी माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार ज्ञानदेव वाफारे यांना शिक्षा झाली आहे. या घोटाळ्यात काँग्रेसच्या नेत्याचे नाव आल्याने नगर मधील भाजपा व इतर पक्ष्यांनी काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले होते.
दरम्यान, वाफारे यांचे नाव घोटाळ्यात आले असल्याने याचा आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभेत फटका बसू नये यासाठी आज नगर जिल्हा काँग्रेस कमिटीने मोठा निर्णय घेतला आहे.
आज वाफारे यांना जिल्हा काँग्रेस कमिटीने निलंबित केले आहे. काँग्रेस पक्षाचे नगर जिल्हा अध्यक्ष जयंत वाघ यांनी ही कारवाई अनिश्चित काळासाठी करण्यात आली असल्याचे म्हटले आहे.
याबाबतचे पत्रक देखील निर्गमित झाले असून या पत्रकात काँग्रेस पक्ष हा सदैव संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या पाठीशी उभा असल्याचे म्हटले गेले आहे. या घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस पक्षाने वेळोवेळी निषेध केला आहे.
यामुळे वाफारे यांना पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे ही कारवाई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि हाय कमांडच्या आदेशावरूनच झाली असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत वाघ यांनी स्पष्ट केले असून लवकरच जिल्हा समन्वयक पदी दुसऱ्याची नियुक्ती होणार असल्याचे वाघ यांनी यावेळी म्हटले आहे.