अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :- विरोधकांनी कितीही आटापिटा केला तरी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही. विरोधी पक्षाची भूमिका पार न पाडता केवळ चुगल्या करण्याचे काम विरोधक करीत आहेत.
केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा जसा दुरुपयोग केला जात आहे, त्याच पद्धतीने आम्ही देखील ‘ कार्यक्रम लावू शकतो’, असा थेट इशारा उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला.
येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ महाविकास आघाडीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांचा केवळ आरडाओरडा सुरू आहे.
विधिमंडळाच्या सभागृहात जनतेचे प्रश्न न मांडता अनेकदा विरोधक हातघाईवर आले. विरोधी पक्षाने खरेतर चुका असतील तर त्या दाखवायला हव्यात.
जनतेचे प्रश्न मांडायला हवे. नगर जिल्ह्यातून सुरत-चेन्नई हा ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे निर्माणाधीन आहे. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या जाणार आहेत.
भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना वाजवी आणि योग्य मोबदला मिळण्यासाठी विरोधकांनी पाठपुरावा करायला हवा.मात्र, जनहिताच्या या कामासाठी विरोधकांना वेळ नाही. ते केवळ केंद्र सरकारकडे चुगल्या करण्याचे काम करत आहेत.अशी टीका केली.