अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-गुंतवणूकदारांची सुमारे आठ कोटींची फसवणूक करणारा बिग मी इंडिया प्रा. लि. कंपनीचा प्रवर्तक सोमनाथ एकनाथ राऊत (मुळ रा. पाथरवाला ता. नेवासा, हल्ली रा. पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर) हा अद्यापही तोंड उघडण्यास तयार नाही.
पत्नी सोनिया ही आपणास सोडून गेली आहे. तिचा कोणताही मोबाईल नंबर, पत्ता आपल्याकडे नाही, कंपनीच्या कर्मचार्यांनीच पैसे हडपल्याची भूमिका त्याने पोलिसांसमोर घेतली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे.
राऊत याने बिग मी इंडिया प्रा. लि. कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून कंपनीची जाहिरातबाजी केली. कंपनीमध्ये पैसे गुंतविल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते.
राज्यातील हजारो गुंतवणूकदारांनी कोट्यावधी रूपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर राऊतने कंपनीचा गाशा गुंडाळला. सतीश खोंडवे (रा. कागल, जि. कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात सोमनाथ एकनाथ राऊत व त्याची पत्नी सोनिया, वंदना पालवे (केडगाव), सुप्रिया आरेकर (बुर्हाणनगर),
प्रितम शिंदे (पुणे), प्रिती शिंदे (बालिकाश्रम रस्ता, अहमदनगर), सॉल्यमन गायकवाड (अहमदनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होण्यापूर्वीच राऊत व त्याच्या साथीदारांनी कंपनीचा गाशा गुंडाळून पलायन केले होते. तोफखाना पोलिसांनी सोमनाथ राऊत याला अटक केली.
त्याला तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरीत करण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेने त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली होती.
कोठडीत असताना सोमनाथ या ठिकाणी तोंड उघडण्यास तयार नाही. पत्नी आपल्या सोडून गेली आहे, तिचा फोन, पत्ता आपल्याला माहिती नसल्याची भूमिका त्याने घेतली आहे.