अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण करून तिच्या गळ्यातील 45 हजार रूपये किंमतीचे मिनी गंठण चोरून नेले.
केडगाव उपनगरातील इंडस्ट्रीयल एरिया परिसरात रविवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी मिरा मोहन शिंदे (वय 52 रा. केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अब्दुल अब्बास सय्यद याच्याविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
मिरा शिंदे यांची केडगाव इंडस्ट्रीयल एरिया परिसरात चहाची टपरी आहे. तेथे त्यांच्या शेजारील दुकानदार गौतमकुमार शिवालय यादव हे रविवारी दुपारी चहा पिण्यासाठी शिंदे यांच्या टपरीवर आले होते.
ते चहा पिऊन परत गेले. काही वेळाने ते पुन्हा टपरीवर आले. त्यांचा मोबाईल तेथे विसरला होता. यासंबंधी तेथे असलेल्या सय्यद याच्याकडे त्यांनी मोबाईल संदर्भात विचारणा केली.
याचा राग त्याला आला. त्याने यादव यांना मारहाण केली. हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या मिरा शिंदे यांनाही सय्यद याने मारहाण करत त्यांच्याकडील गंठण चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहे.