अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2022 :- शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मार्केट यार्ड आवारातील बाजारपेठेत भरदिवसा सीए असणाऱ्या उच्चशिक्षित तरुण व्यापाऱ्यावर २५ ते ३० गुंडांच्या जमावाने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ऋषभ अजय बोरा हे जखमी झाले आहेत.
यावेळी व्यापारी असलेल्या बोरा कुटुंबातील महिलांना देखील गुंडांनी मारहाण करीत पोलिसांसमोर धुडगूस घातल्याची माहिती व्यापारी अजय बोरा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बंदूक, धारदार शस्त्राचा धाक दाखवून हत्या करण्याची देखील धमकी देण्यात आल्याचे बोरा यांनी सांगितले.
बोरांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे लिखित अर्ज करून संरक्षण मागून देखिल दिले गेले नाही. वेळीच संरक्षण दिले असते तर बाजारपेठेत गुंडांची धुडगूस घालण्याची हिंमत झाली नसती. बोरा कुटुंबीयांना व व्यापाऱ्यांना पूर्ण संरक्षण देण्याचे काम काँग्रेस करणार असल्याचे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
काल घटनेची माहिती समजताच पुणे येथे असलेल्या किरण काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी फोनवर संपर्क साधत हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. काँग्रेसचे पदाधिकारी मनोज गुंदेचा, अनंतराव गारदे, खलील सय्यद आदींसह कार्यकर्ते गुन्हा दाखल होईपर्यंत कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून होते.
दरम्यान काल रात्री उशिरा कोतवाली पोलिसांनी बोरा यांच्या फिर्यादीवरून भादवी १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३२४, ५०४,५०६, शशस्त्र अधिनियम ३, २५ अन्वये अजित औसारकर, अनील औसारकर, सुजित औसरकर, अगर यांच्यासह अन्य वीस ते पंचवीस अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
काँग्रेस कार्यालयामध्ये किरण काळे यांच्या उपस्थितीमध्ये खते, बी-बियाणे याचे व्यापारी अजय बोरा यांनी पत्रकारांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. यावेळी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित. अजय बोरा यावेळी म्हणाले की, मार्केट यार्ड बाजारपेठेमध्ये आमची मिळकत क्र. ५२ ही मिळकत आहे.
याबाबत आमचे चुलत भावंडांशी घरगुती स्वरूपाचे मतभेद आहेत. आमच्या चुलत भावाने बेकायदेशीररित्या परस्पर ही जागा औसरकर यांना विकली आहे. ती विक्री बेकायदेशीर आहे. याबाबत दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
औसरकरांनी जागा खाली करून घेण्यासाठी तृतीयपंथीयांना मुखत्यारपत्र करुन दिले आहे. ताबा मारण्यासाठी दहशत करून षडयंत्र रचले जात आहे. बोरा यांनी यावेळी अनेक गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, शहारातील बड्या राजकीय प्रस्थाशी नातेसंबंध असणाऱ्या शशिकांत घिगे यांनी ही जागा खाली करून घेण्यासाठी आमच्यावर अनेकदा दबाव आणला.
या व्यवहारातील घिगे हाच मूळ मध्यस्थ आहे. तेवढ्यावर समाधान झालं नाही म्हणून त्यांनी तृतीयपंथी, महिला भगिनी, गुंड यांना आमच्यावर सोडलं. विनयभंग, ॲट्रॉसिटीची धमकी दिली. औसरकर यांना केवळ चेहरा म्हणून पुढे करण्यात आले आहे. धमक्या, दरोडा, मारहाण, छळवणूक, शोषण यामुळे आमचे जगणे मुश्किल झाले आहे.
४-५ महिन्यांच्या अल्प कालावधीत १२ फिर्यादी दाखल झाल्या आहेत. फिर्यादी दाखल होऊन देखील पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. अशा दहशतीत या शहरात व्यापाऱ्यांनी जगायचे तरी कसं ? असा उद्विग्न सवाल यावेळी बोरा यांनी उपस्थित केला. जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी अर्ज देऊन तासन-तास त्यांच्या दारात उभा राहून पोलिस संरक्षण मागितले.
त्यांनी सुद्धा झिडकारलं. व्यापाऱ्यांना या शहरात आता कुणी वाली राहिला नाही. मात्र किरण काळे आणि शहरातील काँग्रेस आमच्या मदतीला धावून आली. त्यामुळे आम्हाला आधार मिळाला असे यावेळी बोरा म्हणाले. किरण काळे म्हणाले की, जागा वादाचा न्यायालयात खटला न्यायप्रविष्ट असताना देखील राजकीय वरदहस्तातून व्यापार्यांच्या खाजगी मालमत्तांवर बेकायदेशीर ताबा मारण्याचा डाव सुरू आहे.
याबाबत न्यायालय योग्य तो निर्णय घेईल. मात्र अशा पद्धतीने बाजारपेठेत व्यापाऱ्यांवर कोणी दहशत करत असेल तर काँग्रेस ती खपवून घेणार नाही. सीए ऋषभ बोरा या उच्चशिक्षित तरुण व्यापाऱ्याच्या मनात यामुळे नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. सीए होण्यापेक्षा मी गुंड झालो असतो तर बरे झाले असते अशी उद्विग्न भावना त्याने व्यक्त केली आहे.
हे पदाधिकारी म्हणून आम्हाला वेदनादायी आहे. शहरातील तरुणांना रोजगार न देऊ शकणारे, शहराची दैनावस्था करून ठेवणारे आणि केवळ विकासाच्या खोट्या वल्गना करणारे यांच्यामुळे शहरातील व्यापारी, तरुण, उद्योजक दहशतीच्या सावटाखाली जगत आहेत. काँग्रेस बोरा कुटुंबीय आणि व्यापाऱ्यांच्या पाठीशी आहे.
बाजारपेठ हा शहराचा कणा आहे. ती कोणत्याही परिस्थितीत उद्ध्वस्त होऊ देणार नाही. काँग्रेस ती कुणालाही गिळंकृत करू देणार नाही. विभागीय पोलीस महानिरीक्षक यांची भेट घेणार : शहरात कायदा-सुव्यवस्थेचा धाक उरलेला नाही. हत्याकांड, जिल्हा पोलीस अधीक्षक हल्ला अशा प्रकरणात देखील आमचे काही वाकडे झाले नाही. यामुळे आम्ही काहीही करू शकतो असा गैरसमज त्या मंडळींचा झाला आहे.
शिवप्रेमींच्या भावना दुखावणाऱ्या शहराच्या उन्मत्त लोकप्रतिनिधी विरोधात काँग्रेसने तक्रार देऊन ४ दिवस लोटले तरी देखील अजूनही एफआयआर दाखल करून घेण्यात आलेले नाही. शहरातील तरुणांची फसवणूक करणाऱ्या आयटीपार्कचा भांडाफोड काँग्रेसने केला तर काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर शहराच्या लोकप्रतिनिधींच्या दबावातून पोलिसांनी तात्काळ खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
पाच महिने उलटले तरी याचा तपास अजून पोलिसांना संपवता आलेला नाही. मात्र शिवप्रेमींच्या भावना दुखावणारे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देऊन देखील पोलीसच अशा भावना दुखावनाऱ्यांना पाठीशी घालत आहेत की काय असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे यावेळी काळे यांनी म्हटले.
पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांचाच पोलिसांवर दबाव आहे की काय ? या दबावाला पोलीस बळी पडणार आहेत का ? काँग्रेस हे होऊ देणार नाही. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी बोरा कुटुंबियांना तात्काळ बंदूकधारी पोलिस संरक्षण द्यावे.
शिवप्रेमी, भीमप्रेमी, फुलेप्रेमींच्या भावना दुःखविणाऱ्या आमदारांच्या विरोधात तात्काळ फिर्याद दाखल करून घ्यावी. अन्यथा नाशिक विभागीय पोलीस महानिरीक्षक यांची काँग्रेसच्यावतीने आम्ही भेट घेऊ, असे काळे यांनी म्हटले आहे.