Ahmednagar News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने औरंगाबादचे नामकरण करत छत्रपती संभाजी नगर असे नवीन नाव दिले आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्याचे देखील धाराशिव असे नामकरण करण्यात आले आहे. अर्थातच महाराष्ट्रात देखील योगी पॅटर्न सुरू आहे.
उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील आता शहरांची, जिल्ह्याची नावे बदलली जात आहेत. अशातच आता अहमदनगरच्या नामकरणासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे अहमदनगर महापालिकेने या संदर्भातील एक महत्त्वाचा ठराव नुकताच मंजूर केला आहे.
खरे तर गेल्या वर्षी मे महिन्यात चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंती दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा जिल्ह्याच्या नामाकरणाबाबत घोषणा केली होती.
मुख्यमंत्री महोदय यांनी अहमदनगर जिल्ह्याचे “पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर” असे नामकरण केले जाईल अशी घोषणा केली होती.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री महोदय यांनी याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला गेला असल्याचे त्यावेळी सांगितले होते. त्यानुसार आता नामकरणाची पुढील कारवाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर अहमदनगर महापालिकेसह रेल्वे प्रशासन आणि पोस्ट ऑफिस यांचेही ना हरकत प्रमाणपत्र महाराष्ट्र शासनाच्या नगर विकासखात्याकडे सुपूर्त करण्यात आले असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
एवढेच नाही तर आता याबाबत महापालिकेत सुद्धा ठराव मंजूर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महापालिकेकडे अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण “पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर” केले असल्याचा बहुमताचा ठराव मागणी करण्यात आला होता.
यानुसार जिल्ह्याचे नाव बदलण्याचा ठराव महापालिका प्रशासक सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. दरम्यान अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण “पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर” करण्याबाबतचा हा ठराव नुकताच मंजूर करण्यात आलाय.
अहमदनगर महापालिका प्रशासक सर्वसाधारण सभेकडून या नामांतर प्रस्तावाला अर्थातच ठरावाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून समोर येत आहे.