Ahmednagar News : सध्या अहमदनगर जिल्ह्यात विविध व्हायरल आजारांनी धुमाकूळ घातला आहे. या व्हायरल इन्फेक्शनमुळे तापाचे रुग्ण वाढले आहेत. यासोबतच थंडी, घसा, अंगदुखीची अनेक रुग्ण आहेत.
त्यामुळे जिल्हाभरातील बहुतांश रुग्णालये फुल्ल झाली आहेत. मागील महिनाभराचा विचार जर केला तर ३० दिवसांतच थंडीतापाने जवळपास ६८ हजार ९१० रुग्ण फणफणले असल्याची माहिती समजली आहे. यामध्ये डेंग्यू, गोचीड ताप, चिकुनगुनिया, झिका आदी रुग्णांचे देखील प्रमाण आहे.
पावसाळ्यात वेगवेगळ्या साथरोग आजारांचा जनतेला सामना करावा लागतो. जानेवारी ते जुलै २०२४ या कालावधीत जिल्ह्यात ४ लाख ७ हजार ५९० रुग्ण तापाने फणफणले होते. या रुग्णांची रक्त तपासणी केली आहे.
यात ७१ रुग्णांना डेंगी झाल्याचे निष्पन्न झाले. तर ७ रुग्णांना झिकाची वाधा झाल्याचे समोर आले. पावसाळा सुरू होताच जूनमध्ये ६७,२२१ रुग्ण थंडीतापाने ग्रस्त झाले होते.
अशा रुग्णांना हिवताप निदानासाठी रक्त तपासणी केली, यात एकही रुग्ण बाधित दिसला नाही. तर डेंगीचे ७२ नमुने घेण्यात आली होती. यात ८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तसेच जुलैमध्ये हिवतापाची ६८,९१० रक्त नमुने घेतली होती.
यात बाधित आढळले नाही. तर डेंगीची २३१ रक्त नमुन्यांची तपासणी केली असता त्यात ४८ रुग्ण डेंगीने बाधित आढळले. झिकाचे सहा रुग्ण आढळले सध्या धोकादायक समजल्या झिकाचे जिल्ह्यात सहा रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात साथीच्या आजारांना पायबंद घालण्यासाठी सीईओंच्या मार्गदर्शनात जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांनी आरोग्य विभाग अलर्ट केलेला आहे. ज्या ठिकाणी डेंग्यु किंवा झिकाचे रुग्ण आढळले, त्या परिसरात मिशन तत्त्वावर उपाययोजना राबविल्या जात आहे.