अहमदनगर बातम्या

पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न.. फिल्मी स्टाईल पाठलाग.. चार आरोपींसह समोर आले मोठे कांड

Ahmednagar News : अहमदनगर मधून एक फिल्मी स्टाईल थरार समोर आला आहे. गाडी अडवून कारवाईसाठी थांबलेल्या कोतवाली पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न..

त्यानंतर पोलिसांचा सुरु झाला पाठलाग… शहरातील अशोका हॉटेलजवळ गाडी अडवण्यात यश.. चार आरोपींसह मोठा मुद्देमाल ताब्यात…ही घटना घडली केडगाव-सोनेवाडी चौक-नगर शहर या मार्गावर..

अधिक माहिती अशी : कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशीय जनावरांची गाडी अडवून कारवाईसाठी थांबलेल्या कोतवाली पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला. कोतवाली पोलिसांनी पिकअप वाहनाचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करत शहरातील अशोका हॉटेलजवळ ही कारवाई करण्यात आली.

त्यात चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. कत्तलीसाठी नेत असलेल्या ३२ गोवंशीय वासरांची सुटका करण्यात आली. केडगाव हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पहाटे तीनच्या सुमारास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना गोपनीय माहिती मिळाली.

सुप्याकडून नगरच्या दिशेने एक पिकअप वाहन गोवंशीय वासरे घेवून जात आहे. त्यानुसार दराडे यांच्या पथकातील कर्मचारी दीपक रोहोकले, तानाजी पवार, राजेंद्र पालवे, सत्यम शिंदे, सुरज कदम आदींनी केडगाव येथे अंबिका हॉटेलजवळील सोनवाडी चौकात सकाळी साडेसहाच्या सुमारास सापळा लावला.

पिकअप चालकास थांबण्याचा इशारा केला असता त्याने पोलिसांच्या अंगावर पिकअप वाहन घालण्याचा प्रयत्न केला. नंतर पिकअप भरधाव वेगात नगरच्या दिशेने घेवून गेला. पथकाने पाठलाग करुन अशोका हॉटेलजवळ वाहनचालकास पकडले.

यावेळी वाहनातील आलक्या कृष्णा काळे (वय ५०), संदीप आलक्या काळे (वय २४), आलेश काळे (वय २२) व अशोक आलक्या काळे (वय २६, सर्व रा. औसरी खुर्द ता. आंबेगाव) यांना ताब्यात घेतले.

पिकअपमधून ३२ गोवंशीय वासरांची सुटका करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र चंद्रभान पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts