Ahmednagar News : ओरिसातील एक महिला स्टेशन ध्यानात न आल्याने चुकीच्या ठिकाणी उतरल्याने ही महिला रस्ता चुकली आणि भटकत कोल्हार येथे आली परंतु येथील धनंजय शिरसाठ यांनी त्या महिलेच्या नातलगांचा शोध घेत तिला नातलगांच्या हवाली केले.
ओरिसातील एक वृद्ध महिला रेल्वेने हैदराबादहून ओरिसाकडे जात असताना चुकून शिर्डी रेल्वे स्टेशनवर उतरली. त्यानंतर तिला रस्ता न समजल्याने महिनाभरापासून चालत फिरत ती कोल्हारपर्यत आली.
या महिलेला ओडिसी भाषेव्यतिरिक्त दुसरी भाषा येत नसल्याने या महिलेला काहीच सांगता येत नव्हते. ही महिला फिरत चालत कोल्हार खुर्द येथील पाटीलवाडी येथे आली. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला धनंजय चांगदेव शिरसाठ यांची वस्ती असल्याने ही महिला तेथे गेली.
त्या ठिकाणी धनंजय शिरसाठ यांच्या पत्नी स्नेहल शिरसाठ यांनी त्या महिलेला जेवण व पाणी दिले. त्यानंतर तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता तिला भाषा समजत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. शिरसाठ यांनी त्यांच्याच नात्यातील एक व्यक्तीस ओडिसी भाषा येत असल्याचे माहीत असल्याने
त्या व्यक्तीशी संपर्क करून फोन वरून या महिलेबरोबर बोलणे केल्यानंतर या महिलेने तेथील पत्ता सांगितल्यानंतर या महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क करून त्यांना बोलावून घेतले आणि या महिलेस त्यांच्या स्वाधीन केले.
या धनंजय शिरसाठ व स्नेहल शिरसाठ यांनी माणुसकी दाखवत जाताना या महिलेस साडीचोळी करून प्रवास भाडेही दिले.
यावेळी सदर महिला व तिचे नातेवाईक गहिवरून या शिरसाठ कुटुंबियांचे आभार मानत होते. त्यांचे माणुसकीच्या कार्यामुळे त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.