Ahmednagar News : मुस्लिम समाजाच्या भावना दुखविणारे वक्तव्य केल्याप्रकरणी महंत रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी काल शुक्रवारी (दि.१६) येथील मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध सभा घेऊन याबाबत पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
यावेळी शहरातील मौलाना आझाद चौकात झालेल्या सभेत मुस्लिम समाजाचे धर्मगुरू तसेच समाजाचे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते यांनी तरुणाईला शांततेचे आवाहन करीत सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
त्यापुर्वी सकाळी शहरातील सर्व धर्मगुरू तसेच प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होऊन पोलीस उपअधिक्षक डॉ. बसवराज शिवपुजे व शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांची भेट घेऊन महंत रामगिरी महाराज यांनी जे वक्तव्य केले आहे. त्याबद्दल समाजाच्या भावना तीव्र आहेत.
या संदर्भात चर्चा करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच या मागणीसाठी दुपारी मौलाना आझाद चौकात निषेध सभा घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. काल दुपारी शहरातील मौलाना आझाद चौकात सुरू झालेली सभा सुरुवातीला तणावपूर्ण वातावरणात होती.
परंतु नंतर सर्व धर्मगुरूंनी उपस्थितांना शांततेचे आवाहन केले. या संदर्भात पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांना सर्व धर्मगुरूंनी निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याबाबत कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेऊ, असे आश्वासन पोलिसांनी दिले.
या निषेध सभेत जामा मशिदीचे मौलाना मोहम्मद इमदाद अली, मुफ्ती मोहम्मद रिजवान, मुफ्ती मोहम्मद इरशादुल्लाह, मुफ्ती मोहम्मद अतहर हसन, हाफीज जोहरअली, मौलाना अमजदसहाब, माजी नगरसेवक मुजफ्फर शेख व अंजूम शेख, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड. समीन बागवान आदींची भाषणे झाली.