Ahmednagar News : पावसामुळे अनेक भागात विजेचा लपंडाव सुरू असून, लाईट नसल्याने उद्योजक, व्यापारी तसेच नागरिक अतिशय हैराण झाले आहेत. मात्र श्रीगोंदा शहरासह तालुक्यात सुरु असलेल्या महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराबाबत वैतागून नागरिकांनी श्रीगोंदा शहरात भीक मागो आंदोलन करण्यात आले. तसेच आंदोलनात जमा झालेली रक्कम वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.
सध्या राज्यभर मान्सूनचा पाऊस सुरु आहे. यात अनेक भागात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे, कांदा चाळी, मोठमोठी झाडे उन्मळून पडत आहेत. वाऱ्यामुळे फळबागांचे देखील मोठे नुकसान होत आहे, या दरम्यान अनेकदा मोठी झाडे वीज वाहक तारांवर पडून या तारा तुटत असतात. त्यामुळे अनेकदा ग्रामीणसह शहरात देखील वीज पुरवठा खंडित होतो. हा खंडित वीज पुरवठा वेळेवर सुरळीत न झाल्यास उद्योजक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह अधिराऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. श्रीगोंदा तालुक्यात मात्र वीज प्रश्नी नागरिकांनी चक्क भीक मांगो आंदोलन करत पैसे जमा करून ते वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. या अनोळख्या आंदोलनाची मात्र सर्वत्र चर्चा होत आहे.
श्रीगोंदा शहरासह तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू असून, लाईट नसल्याने उद्योजक, व्यापारी तसेच नागरिक अतिशय हैराण झाले होते. वीज प्रश्नाबाबत दि. २० मे रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते.या आंदोलनात तालुक्यातील वीज प्रश्नी प्रलंबित कामे, मान्सून पूर्व दुरुस्तीची कामे करण्यात येतील. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्याबाबत लेखी आश्वासन देण्यात आले होते.
मात्र, मागील तीन महिन्यांपासून कंत्राटी कामगारांना पगार झालेले नसून शहरातील जुनी लाईन दुरुस्त करण्यासाठी साहित्य पुरवठा होत नाही. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सर्व कामे निधीअभावी करणे शक्य होत नसल्याचे कारण देत वीजपुरवठा सुरळीत करण्यास दिरंगाई करत होते. महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराबाबत वैतागून नागरिकांनी श्रीगोंदा शहरात भीक मागो आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जमा झालेली रक्कम अधीक्षक अभियंता खांडेकर, कार्यकारी अभियंता माळी, तसेच सुर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.