Ahmednagar News : यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडणार असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. जून महिना उजाडल्यानंतर मान्सूनपूर्व व मान्सून पावसानेही हजेरी लावली. त्यानंतर अचानक गायब झालेला पाऊस आता पुन्हा नव्या जोमाने सुरु झाला आहे.
परंतु आता गेल्या दोन दिवसात मात्र पावसाने सर्वत्रच जोरदार हजेरी लावली आहे. नगर शहरासह अनेक ठिकाणी मागील २४ तासांत सरासरी ८.३ मि.मी. पावसाची नोंद झाली. आणखी चार दिवस पावसाचे असल्याचा अंदाज वेध- शाळेने व्यक्त केला आहे.
दरम्यान, आतापर्यत जिल्ह्यात सरासरी २२५.३ मि.मी. पाऊस झाला आहे. एकूण पावसाच्या तुलनेत ५० टक्के पावसाची नोंद झाली असली तरीही ८६ गावे ४५८ वाड्यांत पाणीटंचाईच्या झळा सुरुच आहेत. त्यासाठी ८१ टँकर धावत आहेत.
पंधरा दिवसांनंतर सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला. मंगळवारी देखील कमी अधिक प्रमाणात सरी कोसळल्या आहेत. कोपरगाव, संगमनेर पारनेर, पाथर्डी तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सरासरी ५० टक्के पावसाची नोंद झाली आहे. असे असले तरी अद्याप ८६ गावे आणि ४५८ वाड्यांतील भूजलपातळी वाढलेली दिसत नाही. त्यामुळे या गावांतील दीड लाख जनतेसाठी ८१ टँकर धावत आहेत. संगमनेर तालुक्यांत सर्वाधिक २१ टँकर सुरु आहेत.
याशिवाय अकोले ३, कोपरगाव ७, नेवासा २, राहाता १, नगर १०, पारनेर १७, पाथर्डी १२, श्रीगोंदा १ व शेवगाव तालुक्यात ६ टँकर सुरु आहेत.