Ahmednagar News : सध्या महाराष्ट्रातील विविध भागात पावसाचे धुमशान सुरु आहे. पुण्यात देखील मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक धरणे भरली असून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील धरणातून येणारे पाणी भीमा नदीपात्रातून वाहत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या भीमा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, सोमवारी (दि. ५) सिद्धटेक (ता. कर्जत) येथील पूल पाण्याखाली गेला. यामुळे सिद्धटेक- दौंडचा संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे ५ वर्षांपूर्वी ५ ऑगस्ट २०१९ याच दिवशी सिद्धटेकचा पूल पाण्याखाली गेला होता.
तालुका प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी नितीन पाटील आणि तहसीलदार गुरू बिराजदार यांनी दिली. पुणे जिल्ह्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने जवळपास सर्वच धरणे तुडुंब भरली आहेत.
धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग दौंड येथील भीमा नदीपात्रात सोडला जात आहे. कर्जत तालुक्यातील भीमा नदी परिसरात पूरपरिस्थिती उद्भवली आहे.
सोमवारी सकाळी ८ वाजता १ लाख ४० हजार क्युसेकने पाणी सोडल्याने अष्टविनायक सिद्धटेक (ता.कर्जत) येथील अहमदनगर-पुणे जिल्ह्यास जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने सिद्धटेक-दौंड संपर्क तुटला आहे.
सद्यःस्थितीत भीमा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने परिसरातील नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने नागरिक स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. यासह काही शेतातही घुसले आहे.
नदीलगत असणाऱ्या बेडीं, दुधोडी, जलालपूर, भांबोरा, खेड, गणेशवाडी, औटेवाडी, शिंपोरा, बाभूळगाव येथील स्थानिक प्रशासनास खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. नागरिकांनी भयभीत न होता जिल्हा आणि तालुका प्रशासनाच्या सूचनेचे पालन करीत सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी पाटील यांनी केले.