जेऊर : उदरमल परिसरात रात्रीच्या वेळी ड्रोन घिरट्या घालत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या ड्रोनचा पोलिसांनी तपास करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर
माहिती अशी की, गेल्या दोन दिवसांपासून उदरमलच्या महादेव मंदिर डोंगर परिसरात ड्रोनच्या घिरट्या घालण्याचे प्रकार सुरू आहेत. रात्रीच्या वेळी ड्रोन घिरट्या घालत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
घिरट्या घालणारे ड्रोन अनेक नागरिकांनी पाहिले आहे. यापूर्वीदेखील परिसरातील गावांमध्ये असेच ड्रोन घिरट्या घालत असताना नागरिकांनी पाहिलेले आहे त्याचाही अद्याप खुलासा झालेला नाही.
ड्रोनच्या घिरट्या हा काय प्रकार चालू आहे. याबाबत नागरिकांना काहीही माहिती नाही. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून, प्रशासनाने या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ पालवे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.