Ahmednagar News : खा. निलेश लंकेंनी शुक्रवारी नगरमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरु केलं. तब्बल तीन दिवस जनआक्रोश आंदोलन सुरू होते.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मध्यस्थीने व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन यात स्थगित करण्यात आले असले तरी खा. निलेश लंके यांनी मोठा इशाराही सरकारला दिला आहे.
खा. निलेश लंके यांच्या मागण्या नेमक्या आहेत तरी काय? त्यांनी आंदोलन थांबवल्यानंतरही सरकारला काय इशारा दिलाय? पाहुयात सविस्तर…
निलेश लंके यांनी सांगितले की, आमची कांद्याची निर्यातबंदीबाबत मागणी आहे. मंत्र्यांनी सांगितले आहे की, ही निर्यातबंदी आता उठवलेली आहे. परंतु याबाबत कायदा केला पाहिजे अशी आमची मागणी आहे. यावर मंत्री विखे यांनी सांगितले की, हा विषय केंद्राचा आहे.
राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही केंद्राकडे या मागण्या करू. तसेच खा. लंके म्हणाले की याला जोड म्हणून महाराष्ट्रातील सर्वच ४८ खासदार आम्ही एकत्रित येत यावर काही सोल्युशन निघतेय का ते पाहू व तशी मागणी एकमुखी केंद्राकडे करू. दरम्यान या गोष्टीला वेळ लागणार असून आम्हाला वेळ द्यावा असे पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
दुसरी महत्वाची मागणी म्हणजे दूध दरवाढ. खा. लंके म्हणाले की, दुधाचे भाव वाढले पाहिजेत. दुधाची किंमत उत्पादन खर्चावर ठरवली पाहिजे. या मागणीवर विखे पाटील म्हणाले की, आपण दुधावर एक कायदा आणत आहोत. त्यासाठी वेळ लागेल. थोडा वेळ आम्हाला द्या असे ते म्हणाल्याचे खा. लंके म्हणाले.
त्यानंतर अनुदानाबाबत महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. दुधाला डायरेक्ट ४० रुपये भाव द्या. अनुदान देऊ नका. त्यात कागदपत्र जमा करा किंवा इतर कामे करताना पिळवणूक होते त्यामुळे अनुदान बंद करून थेट ४० रुपये पगारात वाढ झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
यावर मंत्री विखे पाटील यांनी सध्या अधिवेशनाचा कालावधी असून यामध्ये काही घोषणा करता येणार नाहीत परंतु लवकरच मोठा निर्णय घेऊ असं म्हटल्याचे लंके यांनी सांगितले.
दिला हा इशारा
या मागण्या मान्य करण्याचा शब्द दिल्याने आम्ही आंदोलन स्थगित केले आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा एकदा आंदोलन उभे राहील, जो पर्यंत शेतकऱ्याच्या खिशात पैसा जात नाही तोपर्यंत आम्ही स्वास्थ बसणार नाहीत.
कदपत्रांची कसलीही पूर्तता झाली नाही किंवा कसल्याही हालचाली झाल्या नाहीत तर पंधरा दिवसांनी पुन्हा एकदा आंदोलन करू असाही इशारा खा.लंके यांनी दिला.