Ahmednagar News : देशात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर लगेचच पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पेरणीसाठी लगबग सुरु झाली आहे. त्यामुळे खाते व बी-बियाणे विक्रीच्या दुकानात सध्या मोठी गर्दी जमा झाली असल्याचे पहावयास मिळत आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रोहिणी व मृग नक्षत्राने सर्वत्र चांगली हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाने आता पेरणीकडे आपला मोर्चा वळवला आहे. मशागत केलेल्या शेताला रोहिणी व मृग नक्षत्राच्या कोसळधारांनी जमीन सुखावली आहे.
आता बळीराजा पेरणीच्या तयारीला लागला असून, बाजारात मूग, बाजरी, सोयाबीन, तूर, उडीद, कपाशी, नाशिक कांद्याचे बियाणे खरेदी बरोबरच रासायनिक खते, औषधे खरेदीसाठी बाजाराकडे वळाला आहे. गेली चार महिने असलेल्या उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊन जिल्ह्यात सर्वाधिक टँकर तालुक्यात सुरू आहेत.
गेली दोन दिवस झालेल्या पावसामुळे आता तालुक्याच्या काही भागातील नद्या-नाल्यांना पाणी आले आहे. गेल्या वर्षी खरिपाच्या हंगामात पहिल्या पावसाने हुलकावणी दिल्याने मूग, बाजरी, उडीद, तुरीचा पेरा कमी प्रमाणात झाला होता. यावर्षी अगदी पहिल्या नक्षत्रापासूनच पावसाने चांगली सुरुवात केली आहे.
पेरणीबरोबरच दूध उत्पादक शेतकऱ्यांनी चारा लागवडीवर विशेष लक्ष दिले आहे. दुभत्या जनावरांना हिरवा पौष्टिक चारा उपलब्ध व्हावा यासाठी बळीराजाने हिरवा चाऱ्याच्या विविध प्रगत जातीच्या चाऱ्याची लागवड करण्यावर भर दिला आहे.
कपासी व सोयाबीनला मागणी
मराठवाडा, विदर्भासह महाराष्ट्रातील काही भागात कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड होते. तसेच सोयाबीनचाही पेरा अधिक असतो. ठरावीक वाणाचे बियाणे मिळावे यासाठी शेतकरी वर्ग बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या दुकानात गर्दी करत आहेत. कपासी व सोयाबीनला मागणी जास्त असल्याचे चित्र आहे.
रविवारी ४२.८ मिलिमीटर पावसाची नोंद
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने जिल्ह्यातील काही भागात हजेरी लावली होती. आता मान्सूनने दमदार आगमन केले आहे. दक्षिणेतील काही भागात पाऊस चांगला झाला आहे. जिल्ह्यात रविवारी ४२.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.