Ahmednagar News : मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने आता राज्यभर पुन्हा एकदा हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. आता पुणे, अहमदनगरसह अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.
दरम्यान काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने नदीला पूर आल्याने कडा येथील अहमदनगर-जामखेड महामार्गावर असलेला तात्पुरता पूल वाहून गेला आहे. त्यामुळे आता नगर-बीड महामार्ग बंद झाला असून पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याचा संपर्क तुटला असल्याची माहिती समजली आहे.
नगर मार्गे जामखेड, बीड, उस्मानाबादला जाणारी वाहतूक वाहतूक बंद झाली असल्याने आता वाहतूकदारांना व प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागेल. पावसाळ्यापूर्वीच कडा येथील जुना पूल पडलेला असून जवळपास मागील वर्षभरापासून जामखेड-नगर मार्गाचे काम देखील अतिशय सावकाश गतीने सुरु आहे.
दरम्यान या महामार्गावरील जुना पूल पडलेला असल्याने पर्यायी तात्पुरता पूल तयार करून वाहतुकीसाठी खुला केलेला होता. काल (सोमवार) रात्री कडा, आष्टी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली.
त्यामुळे कडी नदीला मोठा पूर आला व या पुरातमधेच हा बांधलेला तात्पुरता पूल वाहून जाण्याची घटना घडली. त्यामुळे आता नगर-बीड महामार्ग बंद झाला असून नगर-जामखेड मार्गे प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी रस्त्याचा अवलंब करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जामखेडसह आष्टी तालुक्यातील अनेक विद्यार्थी नगरला शाळा, कॉलेजसाठी प्रवास करतात.
या प्रवाशांना सोलापूर रस्त्याने मिरजगाव-माहीजळगाव-जामखेड या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. मराठवाड्यातील प्रवाशांना पुणे, मुंबईला जायचे असेल तर नगर-जामखेड महामार्गाचा अवलंब करावा लागेल.