Ahmednagar News : गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यात सरासरी १२३.६. मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे पावणेतीन महिन्यांत पावसाची सरासरी ४९०.७ मि.मी. इतकी झाली. एकूण पावसाच्या तुलनेत ११० टक्के पावसाची नोंद झाली आहे.
त्यामुळे नऊ तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. छोटी मोठी धरणे ओव्हरफ्लो होऊन नद्या दुथडी वाहू लागल्या आहेत. दरम्यान कोपरगावमध्ये एकाच दिवसात ८० मिमी पावसाची नोंद झाली. नाशिकमध्येही पावसाने धुमशान केले आहे.
त्यामुळे तेथेही पाऊस जोरदार सुरु आहे. पाण्याची आवक वाढल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील वारी येथील पूल पाण्याखाली गेला आहे. ऐन बाजारच्या दिवशी वाहतूक बंद झाल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला.
रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत नांदूर मधमेश्वर धरणातून ५२३०८ क्युसेकने विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदी दुथडी वाहत आहे. ऐन आठवडे बाजाराच्या दिवशी सकाळपासून पुलावर पाणी असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली.
अनेक गावांचा संपर्क तुटल्याने प्रवाशांना लांबच्या मार्गाचा अवलंब करावा लागला. वारी, शिर्डी, नाशिक, कोपरगाव, सडे, लोणी, भोजडे, वैजापूर, औरंगाबाद अशी वाहतूक या पुलावरून मोठ्या प्रमाणात सुरू असते.
धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नऊ तालुक्यांनी ओलांडली सरासरी
गेल्या आठवडयात झालेल्या दमदार पावसामुळे सहा तालुक्यांची सरासरी ओलांडण्यास मदत झाली आहे. आजमितीस नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, संगमनेर आणि अकोले या नक तालुक्यांनी पावसाची सरासरी ओलांडली आहे.
नेवासा, राहुरी व कोपरगाव या तीन तालुक्यांची सरासरी टक्केवारी ९० तर श्रीरामपूर व राहाता या दोन तालुक्यांतील पामसायी टक्केवारी ७५ इतकी आहे.