Ahmednagar News : अहमदनगरमधून एक भीषण अपघाताचे वृत्त आले आहे. नगर-पुणे रस्त्यावरील पळवे (ता. पारनेर) शिवारात कार व टेम्पोचा भीषण अपघात झाला .यात कारचा चक्काचूर झाला. कल्या रोडवरील अपघाताची घटना ताजी असतानाच हा अपघात घडला.
या अपघातात दोघे ठार झाले तर तिघे जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पो दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारवर जाऊन आदळला. शनिवारी (दि.१३) दुपारी पावणे चारच्या सुमारास हा अपघात झाला.
हैदराबाद येथून आलेले पांढरे कुटुंबीय छत्रपती संभाजीनगर येथे पाहुण्यांना भेटून पुण्याला कारने चालले होते. अपघातात राजेश शिवाजी पांढरे, चैतिका सूर्यकांत पांढरे (दोघेही राहणार हैदराबाद) हे मृत झाले. तर सूर्यकांत चंद्रकांत पांढरे, सुरज व्यंकटराव गुबानोरे, श्रावणी सूर्यकांत पांढरे हे जखमी झाले आहेत.
पांढरे कुटुंबीय हैदराबादहून आले होते. छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी ते पाहुण्यांना भेटले. तेथून पाहुण्यांना पुण्याला सोडण्यासाठी कारने निघाले. पुण्याच्या दिशेने जात असताना नगर-पुणे रस्त्यावरील पळवे शिवारातील संजीवनी हॉटेलसमोर त्यांची कार आली.
त्याचवेळी पुण्याहून नगरकडे भरधाव चालेल्या टेम्पोच्या चालकाचे नियंत्रण सुटले. टेम्पो दुभाजकावर आदळून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या पांढरे कुटुंबीयांच्या कारवर आदळला व पुढे जाऊन पलटी झाला. टेम्पो कारवर आदळून झालेल्या अपघातात राजेश शिवाजी पांढरे, चैतिका सूर्यकांत पांढरे या दोघांचा मृत्यू झाला.
सूर्यकांत चंद्रकांत पांढरे, सुरज व्यंकटराव गुबानोरे, श्रावणी सूर्यकांत पांढरे हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सुपा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण आव्हाड सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त कारमधील जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली.
अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पळून गेला. याबाबत कार चालक ओम दादासाहेब चव्हाण (वय २५, रा. जातेगाव, ता. गेवराई, जि. बीड) याने सुपा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फरार टेम्पो चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली.