Ahmednagar News : अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला पाऊस झाला. त्यामुळे गोदावरी, प्रवरेवरील अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. काही भरण्याच्या मार्गावर आहेत.
दोन्ही जिल्ह्यातील धरणातून गेल्या दहा दिवसांपासून गोदावरी आणि प्रवरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरीतून बावीस, तर प्रवरा नदीतून जायकवाडीच्या दिशेने चार टीएमसी पाणी झेपावले आहे.
आतापर्यंत एकूण दोन्ही नद्यांचे मिळून २६ टीएमसी पाणी वाहिल्याने जायकवाडीचा उपयुक्त पाणीसाठा २७ टक्क्याच्या पुढे सरकला आहे. समन्यायी पाणी वाटपाचे संकट टाळण्यासाठी आणखी पाण्याची गरज आहे.
गोदावरी, प्रवरा नद्यांवरील धरणे भरली असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला. रविवारच्या (दि. ११) सकाळच्या आकडेवारीनुसार दोन्ही नद्यांमधून तब्बल २६ टीएमसीहून अधिक पाणी जायकवाडीत दाखल झाले. त्यात गोदावरीतून २२,
तर प्रवरेतून ४ टीएमसी पाणी जायकवाडीच्या दिशेने गेल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे आहे.
समन्यायी पाणी वाटपाचे संकट टाळण्यासाठी किती टीमएसी पाण्याची गरज?
जायकवाडीचा उपयुक्त पाणीसाठा ६५ टक्क्याच्या पुढे गेल्यानंतर समन्यायीचे संकट टळते. त्यासाठी आणखी पंचवीस ते तीस टीएमसी पाण्याची गरज आहे.
मुळाची आवक मंदावली
मुळा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिल्याने धरणाकडे होणारी पाण्याची आवक मंदावली आहे. झपाट्याने होत असलेल्या पाणीसाठा वाढीला ब्रेक लागला आहे. २६ हजार दलघफू क्षमतेच्या धरणात २२ हजार २७७ दलघफू ८५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
पावसाने ओढ दिल्याने केवळ ३ हजार ८२२ क्यूसेक प्रवाहाने नवीन पाण्याची आवक सुरू आहे. शासकीय निर्देशांकानुसार २२ हजार ८१४ दलघफू पेक्षा अधिक पाणी साठा जमा झाल्यास पाणी सोडण्याचा निर्णय होऊ शकतो.
जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा (१० ऑगस्टच्या आकडेवारीनुसार)
भंडारदरा धरण – १०५९९ दलघफू (९६.०१ टक्के)
मुळा धरण – २२ हजार ७२५ दलघफू (८७ टक्के)
निळवंडे धरण – ७६५२ दलघफु (९१.८८ टक्के)
जायकवाडी धरण – १३४६.७१९ दलघमी (२८.०३ टक्के)
आढळा धरण – १०६० दलघफू (१०० टक्के)