Ahmednagar News : जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली असून, जून महिन्याच्या सुरुवातीलाच आलेल्या पावसाने खरीप हंगामाच्या पेरण्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची आता पेरणीची लगबग सुरू होईल. मागील दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यातील जामखेड, कर्जत, पाथर्डी, श्रीगोंदा, नेवासा तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला.
नगर तालुक्यात देखील सर्व दूर पावसाच्या सरी बरसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. झालेल्या पावसावर खरीप पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांमध्ये लगबग पहावयास मिळत आहे. यावर्षी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती पाहावयास मिळाली. अनेक गावांनी टँकरने पाणीपुरवठा सुरू होता.
त्यामुळे झालेल्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, चालू वर्षी पाऊस निराश करणार नाही, अशी अपेक्षा शेतकरी वर्गामधून व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाने जोरदार सलामी दिली. यामुळे मूग, सोयाबीन, बाजरी, तुर पेरण्याची लगबग सुरू होणार आहे तर काही भागात पेरणीसाठी वापसा होण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. मृग नक्षत्रात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना खरीपाबरोबर रब्बी पिकाचेही नियोजन करता येते.
वेळेवर पाऊस झाल्याने मूग,बाजरी पिकांची पेरणी होते व लाल कांदा, रांगडा कांदा तसेच रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना नियोजन करता येत असते; परंतु मृग नक्षत्रात पावसाने दगा दिल्यास मुगाची पेरणी वाया जात असते.
सलग दोन वर्षे शेतकऱ्यांना पावसाने निराश केले होते. दोन वर्षापूर्वी अतिवृष्टी तर मागील वर्षी पाऊसाने पाठ फिरवल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी खरीप पिकासाठी शेतीची मशागत केलेली आहे.
मृग नक्षत्र सुरू होताच तालुक्यात पावसाने चांगली सलामी दिली. शनिवारी रात्री तसेच रविवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. मात्र पेरणीसाठी आता योग्य वापसा होण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. मान्सूनची आस लागलेल्या शेतकऱ्यांना या मृग नक्षत्रातील पावसाने दिलासा दिला आहे. खते, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी दुकानांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.