जनसेवा युवा मंच आपले कुटूंब आहे.जात आणि धर्माच्या पलिकडे जावून युवकांच्या उज्वल भवितव्याचा आणि समाज उभारणीचा अजेंडा युवा मंचाचा असेल. विचारांच्या आधारावर जनसेवा युवा मंचाचे संघटन विकास आणि समाजिक एकोप्यासाठी उपयुक्त ठरेल,असा विश्वास डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.
जनसेवा युवा मंचाच्या वतीने आयोजित केलेल्या युवक आणि युवतीच्या मेळाव्यात डॉ. सुजय विखे पाटील यांनी युवकांशी संवाद साधत युवा मंचाच्या कार्याचे महत्व विषद केले.वीस हजाराहून अधिक युवक आणि युवती या मेळाव्यास उपस्थित होते. युवक संघटनेच्या माध्यमातून मी सुध्दा कार्यकर्ता म्हणून काम केले.
माझ्या बरोबरच्या अनेक कार्यकर्त्यांना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. याचे एकमेव कारण त्यांनी संघटनेशी ठेवलेली बांधिलकी. आता युवकांना
आपल्याला संघटनेत जोडून घ्यायचे आहे. आपल्याला युवा मंचात जात आणि धर्माला थारा नाही तर फक्त विकासाच्या विचाराला स्थान द्यायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
गेली अनेक वर्षे या भागात विचारांच्या आधारावर विकास प्रक्रीया सुरू आहे. सहकार चळवळ आपल्या विकासाचा मुख्य पाया असून येणाऱ्या काळात युवकांसाठी रोजगार निर्मितीसाठी अधिक काम करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.आपला शिर्डी विधानसभा मतदार संघाला साईबाबांचे आशीर्वाद आहेत.
सबका मालिक एक हाच विचार त्यांनी आपल्याला दिला.त्यामुळे या भागातील सामाजिक एकोपा टिकून आहे.जनसेवा युवा मंच जात धर्माच्या पुढे जावून काम करणार असल्याने आपला अजेंडा विकासाचा आणि समाज उभारणीचा असल्याची भूमिका डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केली.
जनसेवा युवा मंच मध्ये सहभागी होण्यासाठी अॅप विकसित करण्यात आले होते. वीस हजारांपेक्षा अधिक युवक युवतीनी यामध्ये नोंदणी केली असल्याचे सांगून दरवर्षी ८ऑक्टोबरला जनसेवा युवा मंचचा मेळावा आयोजित केला जाणार असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी घोषित केले.