अहमदनगर बातम्या

अहमदनगर मधील दोघा भावांची कमाल ! डाळिंबाची शेती केली अन दीड एकरात घेतले १२ लाखांचे उत्पन्न, थेट आखाती देशात पाठवला माल

Ahmednagar News : शेतीमध्ये काही परवडत नाही असे म्हणणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक तरुण देखील शेतीची वाट न धरता नोकरीसाठी शहरची वाट धरतात. परंतु आता अहमदनगर जिल्ह्यातील दोघा बंधूंनी एक मोठा आदर्श निर्माण केलाय.

आपल्या शेतीत डाळिंबाचे उत्पन्न घेतले अन पाहता पाहता त्यांचे थेट आखाती देशात डाळिंब पोहोचले. त्यांनी दीड एकरात १२ लाखांचे उत्पन्न घेतले आहे. मोहन जनार्दन लामखडे व श्याम लामखडे असे या बंधूंचे नाव असून ते संगमनेर तालुक्यातील केळेवाडी येथील शेतकरी आहेत.

त्यांच्या शेतातील डाळिंबास प्रतिकिलोस १११ रुपयांचा भाव मिळाला आहे. बोटा गावांतर्गत असलेल्या केळेवाडी येथे आता मोठ्या प्रमाणावर डाळिंब बागा फुलल्या आहेत. मोहन व श्याम लामखडे हे बंधू उच्चशिक्षित असतानाही त्यांनी शेती करण्याचे ठरवले आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते शेती करत आहेत.

दीड एकर क्षेत्रात त्यांनी सेंद्रिय डाळिंब केले आहे. मागील वर्षी ओढ्याला वाहून जाणारे पाणी त्यांनी विद्युत मोटारीच्या माध्यमातून उचलून थेट शेततळ्यात सोडले आणि शेततळे भरून घेतले. त्यावर ठिबक सिंचनच्या माध्यमातून डाळिंब शेती फुलवली आहे.

त्यातच यावर्षी उन्हाळाही कडक होता त्यामुळे शेवटी पाण्याची कमतरता असताना देखील डाळिंब अतिशय चांगले फुलवले आहेत. प्रत्येक झाडाला मोठ्या संख्येने डाळिंब आले. व्यापाऱ्याने थेट डाळिंब बागेत येऊन संपूर्ण डाळिंब खरेदी केले आहे.

प्रतिकिलोस १११ रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे. जवळपास बारा टन डाळिंब गेले असून, एकूण बारा लाख रुपये झाले आहेत. खते-औषधे, फवारणी, मजुरी असा एकूण तीन लाख रुपये खर्च झाला आहे, तरी नऊ लाख रुपये मिळाले आहे.

लामखडे बंधूंनी फुलवलेल्या डाळिंबांना चमकही अतिशय चांगली होती. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील अनेक शेतकरी डाळिंब बागेला भेटी देऊन लामखडे बंधूंचे कौतुक करत आहेत. गेल्या चार वर्षांपासून हे बंधू डाळिंबाची शेती करत असून,

दरवर्षी ते डाळिंबांचे चांगले पैसे करत आहेत. पाणीटंचाई असताना देखील त्यांनी केवळ वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्यावर डाळिंबाची शेती फुलवली असून, त्यांना कुटुंबाचीही चांगली साथ मिळत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts