Ahmednagar News :- कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे. अहमदनगर व अहमदनगर शहरातील उपनगरात तसेच वाळकी, शिराढोण सीना नदीक्षेत्रालगतच्या गावांमध्ये नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे सीना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने सीना नदी दुधडी भरून वाहू लागली आहे.
या नदीपात्राचे पाणी कर्जत तालुक्यातील सीना धरणात नुकतेच पोहचले. सिना धरणात पाणीसाठा अल्पसा होता. मात्र, आता पावसामुळे नवीन पाण्याची आवक चालू झाल्याने धरणात आज दुपारी उशिरापर्यंत पाणी वाहत असल्याचे दिसत होते.
आज दुपारी चार वाजेच्या दरम्यान धरण पाणलोट क्षेत्रात एकूण पाणीसाठा ४५७.९१ द.ल.घ.फू. होता. तर पाणी पातळी ५७९.८० अशी आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील सध्याची स्थिती पाहता पाणलोट क्षेत्रात
नवीन पाण्याचा प्रवाह चालू असल्याने मिरजगाव, निमगाव गांगडा, मांदळी व सिना लाभक्षेत्रातील गावांचा पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार असल्यामुळे सिना लाभक्षेत्रालगतच्या गावावरील जलसंकट तात्पुरते का होईना टळले आहे.
यंदा पावसाळा सुरू होऊन तीन महिने लोटले तरी देखील या भागात पाऊस झालेला नव्हता. मात्र, आता धरण पाणलोट क्षेत्रात नवीन पाण्याची आवक चालू असल्याने येथील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.