Ahmednagar News : प्रवरा नदीत बुडालेल्या दोघांना वाचवण्यासाठी गेलेल्या आपत्ती व्यवस्थापन टीम मधील पाच व एक स्थनिक असे सहा जणांना जलसमाधी मिळालेल्या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच परत प्रवरा नदीतच पोहायला गेलेल्या एका शालेय विद्यार्थ्यांचा करूण अंत झाला.
बुधवारी (दि. २९ ) दुपारी दीडच्या सुमारास राहाता तालुक्यातील कोल्हार येथील नदीपात्रात तीन मित्र पोहायला गेले होते; मात्र त्यातील १५ वर्षांच्या एका शालेय विद्यार्थ्यांचा नदीच्या पाण्यात बुडून करूण अंत झाला.
याबाबत माहिती मिळताच मृतदेह शोधण्यासाठी स्थानिक नागरिक व आपत्ती दलाचे जवान दाखल झाले, त्यांच्या पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर नदीपात्राच्या कपारीत मृतदेह मिळून आला. अविनाश पराजी जोगदंड (वय १५) असे या घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार कोल्हार भगवतीपूर येथील अंदाजे १०, १२ व १५ वर्षे वयाची तीन मुले कोल्हार- बेलापूररस्त्यालगत असलेल्या बागमळ्याच्या मागील बाजूस प्रवरा नदीपात्रात पोहायला गेली होती.
अविनाश हा नदीत बुडाल्याची माहिती समाजताच शिर्डी व राहाता येथील आपत्ती व्यवस्थापनची टीम व स्थानिक पट्टीचे पोहणारे नागरीक यांनी त्याचा शोध घेतला.परंतु अविनाश याचा नदीपात्रातील कपारीत अडकलेला मृतदेह मिळून आला.
अविनाश हा बीड जिल्ह्यातील असून तो आपल्या काका- मावशीकडे कोल्हार येथील निर्मल नगरमध्ये राहात होता. नुकताच ९वीमध्ये पास होऊन दहावीत प्रवेश घेणार होता; मात्र त्यापूर्वीच काळाने घाला घातला.
दरम्यान अविनाशच्या मृत्यूस प्रवरा नदीपत्रातील बोटीने होणारा बेसुमार वाळूउपसा कारणीभूत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. रात्रभर येथे बोटीच्या साहाय्याने अवैध वाळूउपसा होत आहे. याचे पुरावे नदीपात्रात पसरलेले दोरखंड देत आहेत. त्यामुळे महसूल विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी येथील नागरिकांमधून होत आहे.