अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : कांद्याचे भाव वाढले : नगरमध्ये मिळाला इतका भाव… !

Ahmednagar News : जिल्ह्यासह राज्यभरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. जूनच्या सुरूवातीलाच समाधानकारक पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीसाठीची तयारी करत आहे. त्यातच गावरान कांद्याच्या भावात देखील वाढ झाली आहे. भाव वाढल्याने खरीप हंगामातील पेरणीसाठी लागणारी बी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी आता शेतकऱ्यांना कोणापुढे हात पसरवण्याची गरज पडणार नाही.

सोमवारी नगरच्या नेप्ती उपबाजार समितीत ३७४ ट्रक म्हणजे ४१ हजार १४१ क्विंटल कांद्याची आवक झाली. यात सरासरी ४०० ते ३१०० रुपये असा दर मिळाले. मागील लिलावाच्या तुलनेत यावेळी चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन मान्सूनच्या आगमनालाच भाव वाढले असल्याने आता कांदा विक्री केली तर खरिपात पेरणीसाठी लागणाऱ्या खते व बियाणे खरेदी करण्यासाठी लागणारी रक्कम वेळीच उपलब्ध होणार आहे. यामुळे थोडा फार का होईना शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.

मागील वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता वैतागला होता. मात्र तरी देखील मोठ्या हिमतीने कांद्याचे पीक घेतले. यासाठी महागडे बियाणे, खते, औषधे आदीचा खर्च केला ऐन कांदा काढणीच्यावेळी कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात राखण्यासाठी केंद्र सरकारने ऑगस्ट २०२३ पासून कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून ज्या शेतकऱ्यांकडे कांदा चाळ आहेत त्यांनी कांदा विक्री कारण्याऐवजी साठवणूक केला.मात्र ज्या शेतकऱ्यांकडे कांदा चाळ नव्हती त्यांना कवडीमोल दराने कांदा विकावा लागला. यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या प्रश्नावरून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढीस लागला होता, त्याचा लोकसभा निवडणुकीत दगाफटका बसू नये म्हणून केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवली खरी पण ती उठवताना काही अटी शर्ती घातल्या आहेत. त्यामुळं कांदा निर्यात करण्यास अडचणी निर्माण होत आहेत परिणामी देशात कांद्याचा पुरवठा जास्त होऊन दरात घसरण होत होती. त्यातच खरीप हंगाम तोंडावर आला होता, पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज होती. मात्र भाव कमी असल्याने काय करावे या विवंचनेत शेतकरी होते.परंतु ऐन हंगामाच्या सुरुवातीसच कांद्याचे भाव झाल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.

दरम्यान सोमवारी नगरच्या बाजार समितीत ७४ हजार ८०२ गोण्यात भरून आलेल्या ४१ हजार १४१ क्विंटल कांद्याला ४०० ते ३१०० रुपये असा भाव मिळाला. यातील १ नंबरच्या कांद्याला २५०० ते ३१००, २ नंबरच्या कांद्याला १६०० ते २५००, ३ नंबरच्या कांद्याला ९०० ते १६००, तर ४ नंबरच्या कांद्याला ४०० ते ९०० असा भाव मिळाला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts