Ahmednagar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३१ मे २०२२ रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘प्रधानमंत्री’ नावाने सुरू असलेल्या १३ केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. पंतप्रधान हे शिमला येथून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
याच कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अहमदनगर जिल्ह्यातील ३ लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत.अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवाद कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज (३० मे) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित तसेच सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. राज्यस्तरावरील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सह्याद्री अतिथीगृह येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत.
सकाळी ९.४५ ते १०.४५ दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात अहमदनगर जिल्ह्यातील तीन लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री संवाद साधतील. त्यानंतर १०.५५ ते १२.१० वाजेदरम्यान राष्ट्रीय कार्यक्रमाच्या माध्यमातून शिमला येथून देशातील या योजनेच्या विविध लाभार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाची जिल्हा स्तरावरील संपूर्ण तयारी झाली असून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी प्रत्यक्ष माऊली सभागृहात जाऊन पूर्व तयारीची पाहणी केली.