Ahmednagar News : बाजारात सध्या गहू, ज्वारी या धान्यांना चांगला भाव भेटल्याचे पाहायला मिळाले. सोयाबीनने मात्र शेतकऱ्यांची नाराजगी केली. परंतु याची कसर उडीद, मूग या पिकांनी भरून काढल्याचे पाहायला मिळाले.
मृग नक्षत्रातील पाऊस गेल्यावेळी फारच कमी झालेले असल्यामुळे उडीद, मूग पिकांचे उत्पादन भरघोस निघाले नाही. त्यामुळे उडीद, मूग या पिकाला चांगला दर मिळाला होता.
दरम्यान मागील वर्षीची तूट पाहता यंदाही या पिकांना मोठी मागणी असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे यंदा देखील ही पिके शेतकऱ्यांना मालामाल करतील, अशी अपेक्षा आहे.
दोन वर्षापासून सोयाबीनला भाव मिळत नाही. तर सध्या उडीद, मूग या पिकांना चांगला भाव आहे. खरिपातील उडीद, मूग काढणीनंतर त्यांना चांगले भाव राहतील असे काही व्यापारी सांगत आहेत.
यंदाही पाऊस समाधानकारक राहिल्यास उडीद, मुगाला चांगला भाव मिळेल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सद्य:स्थितीत अडत बाजारात उडीद, मुगाला ८ हजार ते ९ हजार रुपये यानुसार दर मिळत आहे. भविष्यात याची आवक वाढल्यास दर कमी जास्त होऊ शकतात. दैनंदिन जीवनात डाळवर्गीय धान्याची मोठी मागणी असते.
दररोजच्या जेवणात डाळीशिवाय जेवण अपुरे आहे. त्यासाठी शेतकरी कडधान्याची मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. यामध्ये मूग, उडिदाची खरीप हंगामात शेतकरी पेरणी करतात. यावर्षी उडीद व मूग, तुरीला सोयाबीनपेक्षाही जास्तीचा दर मिळत असल्याने शेतकरीवर्ग या पिकांकडे वळल्याचे दिसत आहे.
उडीद, मूग क्षेत्र वाढले
अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश भागात जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. रोहिणी व मृग नक्षत्राने हजेरी लावली. त्यामुळे उडीद व मुगाच्या पेरण्या ८० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्या असल्याची माहिती आहे. गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा पेरण्या चांगल्या झाल्या आहेत.