Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात मुलींच्या अपहरणाच्या घटना घडत असल्याचे प्रकरणे समोर आली आहेत. आता शाळकरी मुलीला पळवल्याची घटना समोर आली आहे.
राहुरी तालुक्यातील एका शाळकरी अल्पवयीन मुलीबाबत ही घटना घडली. अज्ञात इसमाने अपहरण केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात नविन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अपहरण झालेल्या मुलीच्या वडीलांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले,
माझी अल्पवयीन मुलगी राहुरी शहरातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. (दि.३) रोजी नेहमीप्रमाणे सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ती राहुरी येथे शाळेत गेली होती. तसेच तिची शाळा ही दुपारी १२ वाजता सुटते. परंतु मी माझे काम संपवून संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घरी गेलो असता,
माझ्या पत्नीने मला सांगितले की, मुलगी शाळा सुटली तरी घरी आली नाही, असे सांगितल्याने मी व पत्नी आम्ही दोघांनी मुलीचा शाळेचा परिसरात तसेच आजुबाजुला नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याकडे शोध घेतला असता, परंतु मुलगी मिळून आली नाही.
त्यामुळे माझी खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात इसमाने माझ्या अल्पवयीन मुलीस अज्ञात कारणाकरीता माझ्या संमतीशिवाय फुस लावुन पळवून नेले आहे.
पिडीत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.