Ahmednagar news : शिर्डीचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या कामाची कार्यतत्परता दाखवत नेवासा तालुक्यातील पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या पीक व फळबागांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश नेवासा तहसीलदारांना दिले आहे.
दोन दिवसांपूर्वी खासदारपदी निवड झाली. त्यानंतर सत्कारांचा ओघ चालू असताना शेतकरी वर्गावर आलेल्या संकटाची जाण ठेवून सत्काराला बाजूला करत प्रथम शेती प्रश्नांवर लक्ष वेधून नेवासा तहसीलदारांना नुकसान झालेल्या फळबागांसह शेतीपिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले, अशी माहिती खा. वाकचौरे यांचे स्विय सहाय्यक सोनवणे यांनी दिली. सत्कार समारंभाला बाजुला ठेवत शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाची तातडीने दखल घेऊन तहसीलदारांना नुकसान झालेल्या फळबागांसह शेतीपिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याबद्दल खरवंडी येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब कुहे यांच्यासह अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी खासदार वाकचौरे यांचे आभार मानले आहे.
सध्या एकीकडे लोकसभेच्या निकालानंतर विजयी उमेदवारांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. तर दुसरीकडे राज्यात पावसाळा सुरु झाला आहे. यात वादळी वारे व पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
शनिवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या वादळी वारे व पावसाने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले तर वीज वाहक तारा तुटून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला. त्याचसोबत जोरदार वादळाने मोठमोठी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली त्यामुळे अनेक भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती.
नेवासा तालुक्यात देखील पाऊस व वाऱ्यामुळे पीक व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. खा. वाकचौरे यांनी नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश नेवासा तहसीलदारांना दिले आहेत.