Ahmednagar News : उन्हाळी सुट्टी लागली की लगेच सुरु व्हायचे मनोरंजनाचे खेळ. यात प्रामुख्याने चांफुल्या, सापशिडी, लुडो, पत्ते आदी खेळ रंगायचे. बाहेर ऊन असल्याने घरातच हे खेळ सुरु व्हायचे. यात मुलांसोबत घरातील मोठी माणसेही सहभागी व्हायची.
यातून मिळायचा तो निखळ आनंद. परंतु सध्या इंटरनेटच्या जमान्यात या खेळाचे स्वरूप बदललं. हे खेळ आता मनोरंजनापासून भरकटले तर थेट जुगाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
ग्रामीण भागातील तरुणाई या ऑनलाइन जुगाराकडे आकर्षित होत असून स्कील गेमच्या नावाखाली हे प्रकार सुरू असल्याचे दिसते. धक्कादायक म्हणजे यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसत आहे. या ऑनलाइन गेममुळे तरुणांच्या आयुष्याशी मोठा खेळ खेळाला जात आहे.
इंटरनेटच्या विविध साइटवर हे अॅप उपलब्ध आहेत. त्यावरून हे गेम डाउनलोड करण्यात येतात. अॅपवर आपला स्वतःचा आयडी तयार करावा लागतो. यासाठी दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात पूर्वीपासून त्यावर आयडी असलेली मंडळी नवीन यूझर्सचे नाव आणि मोबाइल क्रमांक अॅप अॅडमिनला रेफर करतात. यानंतर अॅडमिन यूजर्सशी संपर्क साधून त्याचा आयडी तयार करतो.
दुसऱ्या प्रकारात जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला जातो. तो फोनवरील व्यक्ती आयडी तयार करून देतो. आपल्या आयडीवर लॉगिंग केल्यानंतर यूझर्स पाहिजे त्या खेळाला जुगार खेळण्यासाठी निवडून तो जितकी रक्कम आयडीवर डिपॉझिट करेल त्या प्रमाणात तो असले जुगारी खेळू शकतो.
जितकी रक्कम लावली, त्याच्या डबल रकमेचे आमिष खेळाडूला दाखविण्यात येते. यदाकदाचित जिंकल्यास जिंकलेली रक्कम यूजर्स विड्रॉल करून घेऊ शकतो.
यासाठी अॅपची दुसरी टीम विड्रॉलचे काम करते. या टीमच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर यूझर्सचा आयडी क्रमांक आणि बँक खात्याची माहिती पाठवावी लागते. यानंतर काही वेळात त्याच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. हरल्यास लावलेली रक्कम गमवावी लागते. यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते.
विविध ठिकाणी आकर्षक जाहिराती
सध्या जाहिरातींचा जमाना असून हे असले गेम खेळणारे फेसबुक, इन्स्टाग्राम, तसेच विविध चॅनलवर ऑनलाइन जुगाराच्या जाहिराती करताना दिसून येतात. यामध्ये तीन पत्ती, जंगली रमी, लुडो तसेच क्रिकेटशी संबंधित खेळाच्या जाहिरातींचाही समावेश आहे.
जाहिरातीच्या माध्यमातून या जुगारांच्या खेळाकडे आकर्षित केले जाताही. तरुण याकडे आकर्षित होतात. परंतु यामुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाल्याचेही अनेक उदाहरणे आहेत.