Ahmednagar News : घरासमोरील अंगणात खेळत असताना दिडवर्षीय चिमुकलीला बिबट्याने गिन्नी गवतात उचलून नेत ठार केले. बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला.
ही घटना बुधवारी (दि.१०) संध्याकाळी साडेपाच सहाच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे घडली. ओवी सचिन गडाख असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलीचे नाव आहे. हिवरगाव पावसा शिवारात गडाख वस्ती आहे.
गडाख कुटुंबीय दूध उत्पादक शेतकरी आहेत. ओवी हिची आई गवत कापण्यासाठी तिला सोबत घेऊन गेली होती. ओवी हिला शेताच्या बांधावर ठेवून आई गवत कापण्याचे काम करत होती. याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक या बालिकेवर हल्ला करत तिची मान पकडली.
या मुलीने आरडाओरड केली. गावातील शाळा सुटल्याने काही शिक्षक यावेळी रस्त्यावरून जात होते. मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून ते घटनास्थळी धावले. यानंतर बिबट्याने तेथून धूम ठोकली.
दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात सदर बालिका गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने संगमनेर शहरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच तिचे निधन झाले.
आई-वडिलांचे प्रयत्न अधुरे
आई- वडिलांच्या डोळ्यादेखतच दिडवर्षीय ओवी चिमुकलीला बिबट्याने उचलून समोर असलेल्या गिन्नी गवतात नेले होते. बिबट्याच्या तावडीतून वाचविण्याचाही आई वडीलांनी खूप प्रयत्न केले. मात्र बिबट्याने अखेर ओवीला ठार केले. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने आई वडिलांनी हंबरडा फोडला होता.
पिंजरे लावण्याची मागणी
संगमनेर तालुक्यात लहान मुलांवर बिबट्याने हल्ला करण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. असे प्रकार अनेकदा घडले. त्यामुळे वन विभागाने बिबटे असलेल्या परिसरात त्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.