Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील कनोली येथील ३५ वर्षीय तरुण दीपक दादाभाऊ बलसाने यांनी शुक्रवारी (दि.०५) दुपारी चार वाजेच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येप्रकरणी बजाज कंपनीच्या संगमनेर शाखेतील दोघांविरोधात आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फायनान्स वर घेतलेल्या दुचाकी गाडीचा हप्ता भरण्यासाठी फायनान्स कंपनीकडून होत असलेल्या त्रासाला वैतागून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मयत दीपक बलसाने या तरुणाने पाच महिन्यांपूर्वी आकाश बाळासाहेब लाहुंडे (रा. धांदरफळ) यांच्या नावावर हिरो कंपनीची दुचाकी घेतली होती.
या दुचाकीवर फायनान्स कंपनीचे कर्ज होते. त्यामुळे हा तरुण नेहमी तणावाखाली राहत होता. महिन्याला तीन हजार रुपये हप्ता भरत होता. ९० हजार पाचशे रुपये रोख स्वरूपात देऊनही फायनान्स कंपनीचे शेखर पवार आणि मॅनेजर गणेश गाडेकर हे त्रास देत होते.
त्यामुळे वैतागून दीपक दादाभाऊ बलसाने या तरुणाने राहत्या घरात गळफास घेतला. ही माहिती मिळताच गावातील दिलीप वर्षे, गौरव जगताप, भागवत बलसाने, हर्षल बससाने यांच्या मदतीने भाऊ सचिन बलसाने यांनी दीपकचा मृतदेह खाली घेतला.
त्यावेळी दीपकच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत लिहिले होते की, “शेखर व त्यांचे साहेब गाडी घेऊन गोड बोलले व पैसे घेतल्यानंतर वेगळे बोलायला लागले. माझ्या मैतीला नाही पण, दशक्रिया विधीला गाडी आणा. ते एजंट पैसे परत देत नव्हते.
तसेच ९० हजार पाचशे रुपये दिले होते. त्यामुळे कंटाळून फाशी घेत असल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे. दरम्यान सचिन बलसाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आश्वी पोलीस ठाणे येथे फायनान्स कंपनीचे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.