Ahmednagar News : नगर-मनमाड महामार्गाची दुरवस्था हा नेहमीच चर्चेत असणारा विषय. या रस्त्याची झालेली दुरवस्था अन त्यामुळे होणारी प्रवाशांची दैना यामुळे नागरिकांत सध्या असांतोष आहे.
आता या रस्त्याबाबत प्रशासन व शासन दोघेही ऍक्शनमोडवर आले आहे. येत्या १५ दिवसांत नगर-मनमाड महामार्गाची दुरुस्ती करण्याचे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून त्यांनी हे दुरुस्तीचे काम १५ सप्टेंबरपर्यंत करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, तुकडे बंदी संदर्भात पुढील महिन्यात नवे धोरण मंत्रिमंडळापुढे मांडले जाणार असल्याची माहिती मंत्री विखे यांनी दिली. नगर-मनमाड महामार्गासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून दुरूस्ती कालावधीत या महामार्गावरील जड वाहतूक दोन दिवसात अन्यत्र वळविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
या महामार्गाचे काम बऱ्याच वर्षापासून रखडल्याने संतप्त जनमत लक्षात घेता याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेणार असल्याचे संकेत मंत्री विखे यांनी नगर- मनमाड महामार्ग कृती समितीला दिले आहेत.
कंत्राटदारावर कारवाईचा प्रस्ताव
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, शिर्डी ते अहमदनगर रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड़े आहेत, सण-
उत्सवाचे दिवस असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो.
त्यामुळे महामार्गावरील खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी. त्यासोबतच कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी आणि रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी गांभीर्याने कार्यवाही करावी.
रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात मार्गावरील सर्व खड़े बुजविण्यात येतील, असे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याऱ्यांनी सांगितले.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरींना भेटणार
हायब्रीड व बीओटी अशा दोन्ही मिळून हॅम्प पद्धतीने रस्त्यांची २५ ते ३० हजार कोटींची कामे देशभरात सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, नगर-मनमाड महामार्गाचे काम सुमारे हजार कोटींचे असले तरी ते हॅम्प पद्धतीने व्हावे, यासाठी कृती समितीसमवेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट करून मंत्री विखे पाटील म्हणाले,
बीपीसीएल व रिलायन्स कंपन्यांनी गॅस पाईपलाइनसाठी या रस्त्याचा खोदलेला भाग पुन्हा दुरुस्त करून देण्याबाबत दोन्ही कंपन्यांना सांगितले जाणार आहे. पावसाळा जरी सुरू असला तरी पावसाळ्यात काम करण्याच्या नवीन पद्धतीने रस्त्याची दुरुस्ती केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.