Ahmednagar News : क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणजेच अहमदनगर. या जिल्ह्याला सहकाराचा मोठा वारसा लाभला आहे. सहकार क्षेत्रात अहमदनगर जिल्ह्याने मोठी नेत्र दीपक कामगिरी केली असून सहकाराचे क्षेत्र कसे असावे हे नगरने संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे. मात्र याच आदर्श सहकारावर दूधगंगा नागरी पतसंस्थेमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. या दूधगंगा नागरी पतसंस्थेत तब्बल 81 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे.
दरम्यान याच गैरव्यवहारातील मुख्य आरोपी वैद्यकीय तपासणीच्या आडून रुग्णालयात आराम करत असल्याची माहिती आता समोर आली आहे. यामुळे ठेवीदारांमध्ये मोठी नाराजगी असून या प्रकरणामुळे सध्या संगमनेर मध्ये मोठी खळबळ माजली आहे. सदर पतसंस्थेमध्ये झालेल्या आर्थिक अपहार प्रकरणात मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे हा सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. खरे तर हा मुख्य आरोपी एक बडा राजकारणी आहे. दरम्यान, राजकीय आसामी असल्याने या
आरोपीला तुरुंगातून दूर ठेवण्यासाठी त्याला स्पेशल ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा सदर आरोपी तब्बल नऊ महिने पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. नेमकी तपास यंत्रणा त्याच्यापर्यंत पोहोचण्यास इच्छुक नव्हती की खरंच तो सापडत नव्हता ही एक विश्लेषणाची गोष्ट आहे.
कारण की आरोपीने नऊ महिने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्यानंतर तो स्वतःहून तपास यंत्रणांच्या स्वाधीन झाला होता. तो गेल्या काही दिवसांपासून संगमनेरच्या दुय्यम कारागृहात तुरुंगात होता. दरम्यान न्यायालयीन कोठडीत असताना अचानकपणे सदर मुख्य आरोपीला अदृश्य आजार झाला. त्याला तातडीने संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.
विशेष म्हणजे तिथे तीन-चार दिवस राहिल्यानंतर त्याला लगेचच नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. यामुळे या संगमनेरातील हायप्रोफाईल आर्थिक अपहार प्रकरणातील कुटे या मुख्य आरोपीला नेमके काय झाले आहे असा सवाल ठेवीदारांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
सुरुवातीला प्रसारमाध्यमांना त्याला नेमकं काय झालं आहे याबाबत कोणतीच माहिती दिली जात नव्हती. पण, आता या आरोपीला नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याइतका गंभीर आजार नसल्याची बाब समोर आली आहे. विशेष बाब अशी की अगदी किरकोळ वैद्यकीय तपासणी करण्यासाठी नगर वरून त्याला पुण्याला हलवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा सध्या ठेवीदारांमध्ये जोर धरू लागली आहे.
कारण की या मुख्य आरोपीला नेमका कोणता आजार झाला आहे या संदर्भात रुग्णालयाकडून कोणतीच ठोस माहिती मिळू शकलेली नाही. अशातच या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे सिविल हॉस्पिटल मधील सर्जन डॉक्टर संजय घोगरे यांना हा आरोपी रुग्णालयात भरती आहे याची माहितीचं नाहीये.
यामुळे या आरोपीला तुरुंगातून दूर ठेवण्यासाठी वैद्यकीय आणि महसूल प्रशासनाच्या माध्यमातून हा ड्रामा तर तयार केला जात नाही ना अशी शँका बोलून दाखवली जात आहे. परिणामी या प्रकरणात स्वतः माननीय न्यायालयाने जातीने लक्ष घालावे आणि ठेवीदारांना न्याय द्यावा अशी हाक मारण्यात आली आहे.
एकंदरीत, संगमनेरातील दूधगंगा नागरी पतसंस्था अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात तीन-चार दिवस आणि आता सिविल हॉस्पिटलमध्ये गेल्या सात दिवसांपासून किरकोळ कारणावरून आराम करत असल्याचा आरोप केला जात आहे.
यामुळे, ठेवीदारांनी नेमका या आरोपीला कोणता गंभीर आजार झाला आहे याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर खुलासा करावा अशी मागणी उपस्थित केली आहे. यामुळे आता या प्रकरणात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून काय उत्तर दिले जाते आणि न्यायालय यामध्ये काही हस्तक्षेप करते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.