Ahmednagar News : राहुरीच्या डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चौथ्यांदा निविदा प्रसिद्ध केलेली आहे. त्यानुसार २७ जून ते ५ जुलै या कालावधीत राज्यभरातून दोघांनी निविदा नेल्या आहेत.
यात पुण्याच्या भुलेश्वर शुगर आणि बीडच्या मोहटादेवी शुगर यांचा समावेश आहे. दरम्यान, निविदा नेण्यासाठी आज ६ जुलै अंतिम मुदत असून आजपासूनच ८ तारखेपर्यंत कारखान्यांच्या मालमत्ता पाहणी कार्यक्रमाची मुदत आहे. आज निविदा नेण्याचा शेवटचा दिवस असल्याने डॉ. तनपुरे साखर कारखान्यासाठी आणखी किती निविदा जाणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.
राहुरीच्या डॉ. तनपुरे साखर कारखान्यांच्या १३४ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी यापूर्वी जिल्हा बँकेने तीनवेळा निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता बँकेच्या संचालक मंडळाच्या निर्णयानुसार चौथ्यांदा फेरनिविदा काढण्यात आली.
राहुरी तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कामधेनू असणाऱ्या डॉ. तनपुरे साखर कारखाना चालावा, यासाठी काही वर्षापूर्वी जिल्हा बँकेने कारखान्यांला ९० कोटी ३ लाख रुपयांचे कर्ज दिले होते. त्या कर्जावर आता ४४ कोटी ९३ लाख रुपयांचे व्याज झाले असून यामुळे दोन वर्षापूर्वी जिल्हा बँकेने हा कारखाना ताब्यात घेवून तो भाडेतत्वार चालवण्याचा निर्णय घेतला.
यासाठी सलग तिनवेळा निविदा प्रसिद्ध होऊनही त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे बँकेने चौथ्यांदा निविदा प्रक्रिया राबवली आहे. यानूसार निविदा नेण्यास आज शेवटची मुदत आहे. जिल्हा बँकेच्या थकीत कर्जाच्या रक्कमेच्या वसुलीसाठी दरवर्षी १७ कोटी २५ लाख रुपयांचे भाडे आकारण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे.
कारखान्यांकडे मिल आणि डिस्टीलरी प्रकल्प असून गाळप क्षमता ४ हजार २५० प्रतिदिन आहे. कारखान्यांच्या सर्व तांत्रिक बाबी ठरवण्यात आलेली बयाणा रक्कम आणि सर्व तांत्रिकबाबी थकबाकीसह मागील महिन्यांत चौर्थ्यांदा निविदा प्रसिध्द करण्यात आली. त्यानुसार पुण्याच्या भुलेश्वर शुगर आणि बीडच्या मोहटादेवी शुगरने कारखाना चालवण्यात रस दाखवत निविदा नेलेली आहे.
निविदा दाखल करण्यास ११ जुलैला शेवटची मुदत आहे. त्यानंतर दाखल निविदा उघडण्यात येणार असल्याची माहिती बँकेच्यावतीने प्रधिकृत केलेले अधिकारी एन. के. पाटील यांच्यावतीने देण्यात आली. तसेच आजपासून कारखान्यांची मालमत्ता पाहणी कार्यक्रम होणार असल्याचे सांगण्यात आले.
तनपुरे कारखान्याकडे जिल्हा बँकेचे १३४ कोटी रुपये थकीत असले तरी हा बंद कारखाना सांभाळणे बँकेसाठी जिकीरीचे झाले आहे. दोन वर्षात सुरक्षा व्यवस्था व इतर कारणासाठी बँकेला सुमारे २ कोटी रुपये खर्च आलेला आहे.
याशिवाय कारखाना बंद असल्याने तेथे चोऱ्याही वाढल्या आहेत. त्यामुळे नुकसानही होत आहे. जिल्हा बँकेने पोलिसांकडे तक्रार अर्ज देऊन कारखाना परिसरात गस्त वाढवण्याची मागणी केलेली आहे. मात्र, दिवसेंदिवस कारखान्याच्या मालमत्तेची किंमत कमी होत असून यामुळे बँकेचे नुकसान वाढत असल्याची चर्चा आहे.