Ahmednagar News : सध्या नगरकरांचा प्रवास हा जुनाट बसमधून सुरु आहे. नगरकरांच्या सेवेत येणाऱ्या ई- बस अद्यापही आलेल्या नाहीत. याचे महत्वाचे कारण म्हणजे महापालिकेकडून उभारल्या जाणाऱ्या ई- बसच्या चार्जिंग स्टेशनला वीजपुरवठा करण्यात महावितरणने खो घातल्याने शहरासाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या ४० ई- बसची प्रतीक्षा लांबणीवर पडली आहे.
परिणामी आणखी काही महिने नगरकरांना खासगी ठेकेदाराच्या जुनाट, मोडक्या बसनेच प्रवास करावा लागणार आहे. ई-बससाठी महापालिका केडगाव उपनगरात चार्जिंग स्टेशन उभारत आहे. त्यासाठी जागाही निश्चित झाली, वीज भारही मंजूर झाला,
मात्र महावितरणच्या सोनेवाडी उपकेंद्रापासून महापालिकेच्या चार्जिंग स्टेशनपर्यंत अद्याप विजेचा पुरवठा करणारी वाहिनीच टाकली नाही. महापालिकेने त्यासाठी पाठपुरावा केला, मात्र महावितरणे अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे हे चार्जिंग स्टेशन उभारणी रखडली आहे.
तसेच रखडलेले वीजबिलही यात अडथळा ठरत आहे. २३० कोटी रुपयांच वीज थकीत आहे महापालिका चालू बिल भरते पण जुने बिल भरायला तयार नाही. त्या संदर्भात महावितरणी बऱ्याच वेळा बैठका घेऊन महावितरण अधिकाऱ्यांनी अनेक वेळ भेट घेऊन तोडगा निघाला नाही असे समजते.
केंद्र सरकारच्या शहर विकास मंत्रालयामार्फत देशभरात, शहरांतर्गत पी एम ई-बस सेवा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत देशातील १६९ शहरांचा समावेश झाला आहे. त्याअंतर्गत नगर शहरासाठी ४० ई-बस उपलब्ध होणार आहे. त्यासाठी महापालिका चार्जिंग स्टेशन उभारत आहे.
मात्र महावितरणने अद्याप चार्जिंग स्टेशनसाठी वीजपुरवठा उपलब्ध केलेला नाही. पीएम ई-बस सेवा योजनेसाठी केंद्र सरकारने २० हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून १६९ शहरांना १० हजार ई- बस उपलब्ध केल्या जाणार आहेत. नगरला मात्र अद्याप यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.