अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2022 :- रोहित्राचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तब्बल तीस एकर क्षेत्रावर असलेला ऊस जाळल्याची घटना नुकतीच पाथर्डी तालुक्यात घडली होती.
आता परत शेतातील वीज खांबावर विद्युत वाहक तारांची स्पार्किंग होऊन शेतात ठिणग्या पडल्याने आग लागून सव्वा एकर क्षेत्रातील ऊस जळाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील कारवाडी शिवारात घडली आहे.
ऊसाला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. लोहारे येथील कारवाडी शिवारात गोरक्ष पोकळे यांची शेती आहे. शेतात असलेल्या सव्वा एकर क्षेत्रातील ऊसाला आग लागल्याचा प्रकार नजीकच्या शेतकऱ्यांच्या प्रकार लक्षात आला.
त्यानंतर त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येवू शकली नाही. वीज खांबावरील विद्युत वाहक तारांची स्पार्किंग होऊन शेतात ठिणग्या पडल्याने ऊसाला आग लागल्याचे शेतकरी गोरक्ष पोकळे यांनी सांगितले.
ग्रामपंचायत व महसूल विभागाच्या अधिकाºयांनी आगीत जळालेल्या ऊसाचा पंचनामा करावा, अशी मागणी शेतकरी पोकळे यांनी केली आहे.
या घटनेत त्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.