गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील अल्पवयीन मुलीचा मृतदेह गावातीलच शनिमंदिरालगतच्या बारवेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर तिच्या आई वडिलांनी मोठा हंबरडा फोडलाय.
वैष्णवी विश्वास तांदुळवाडे (वय-१६) असे अल्पवयीन मृत तरुणीचे नाव आहे. देवळाली प्रवरातील वैष्णवी तांदुळवाडे ही ६ दिवसापासून बेपत्ता होती. याबाबत तिच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून देवळाली प्रवरा येथिल अनिकेत गोरख चव्हाण या तरूणावर दाखल करण्यात आला आहे.
तो पोलिस कोठडीत होता. गुरुवारी त्यास न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आज दुपारी अल्पवयीन तरूणी वैष्णवी हिचा बारवेत मृतदेह आढल्याने एकच खळबळ उडाली वैष्णवी हिने आत्महत्या केली की तिचा कोणी घातपात केला? याबाबत शंका व्यक्त होत आहे.
घटनास्थळी राहुरीचे पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील पो.हे.काँ.पी.बी.शिरसाठ, पो.ना.सागर माळी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करुन मृतदेहाचा पंचनामा केला. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. मृतदेह आढळल्याचे समजताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.
अल्पवयीन वैष्णवीचे अपहरण झाल्यानंतर ती बारवेजवळ आली कशी? ही आत्महत्या की घातपात याबाबत चर्चेला उधाण आले आहे. मात्र शनिवारी दिनांक २६ रोजी वैष्णवीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याच दिवशी रात्री अनिकेत गोरख चव्हाण यास पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे मयत वैष्णवीच्या मृत्यमागे नेमका हात कुणाचा किंवा तिने आत्महत्या केली का याबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी मुलीचे वडील विश्वास तांदुळवाडे यांना मृतदेह दाखविण्यात आल्यानंतर आई वडीलांनी हंबरडा फोडला.मृतदेह बाहेर काढण्यासाठी देवळाली प्रवरा नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासह मुकेश डांगे, केतन शेरगिल, अमोल विलास मुसमाडे, भारत साळुंके, सुधीर टिक्कल, सोमनाथ सूर्यवंशी मुकुंद मुसमाडे आदींनी प्रयत्न केले.
घटनास्थळी पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी भेट देवून मृतदेहाची पाहणी करुन समक्ष ओळख पटवून घेतली.राहुरी पोलिस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलिस करीत आहेत.