अकोले

अतिक्रमणावर हातोडा ; सर्वसामान्यांची शिकार करत उपजीविका सोडली वाऱ्यावर परंतु बड्या माश्यांना अभय !

१ जानेवारी २०२५ अकोले : कोल्हार-घोटी राज्य मार्गालगतच्या अतिक्रमणांविरोधात अकोले नगरपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिस बंदोबस्तात संयुक्त कारवाई सुरू केली आहे.तात्पुरत्या स्वरूपातील अतिक्रमणे हटविण्यात आली, मात्र पक्क्या बांधकामांना अभय दिल्याचे बोलले जात आहे.या मोहिमेमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

अतिक्रमणांविरुद्ध सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी अकोल्याचे तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांना निवेदन दिल्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली.डॉ. मोरे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपंचायतचे अधिकारी, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, अकोले पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज मोरे, उपअभियंता मोरे, शाखा अभियंता पाचोरकर, मुख्याधिकारी पंकज गोसावी यांची बैठक झाली.

यानंतर महात्मा फुले चौक ते नवलेवडी फाटा या मार्गावर अतिक्रमणाची पाहणी करण्यात आली आणि तोंडी सूचना व लेखी नोटीस देण्यात आली.मुदतीनंतरही अतिक्रमण न हटवल्याने, मंगळवारी सकाळपासून अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू झाली.रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या तात्पुरत्या स्वरूपातील छत्र्या, पत्र्याचे शेड्स, टपऱ्या, बोर्ड, लोखंडी बाकडे, हातगाड्या आणि अन्य साहित्य हटवण्यात आले.

हटवलेले साहित्य प्रशासनाने ताब्यात घेतले आहे.अतिक्रमण मोहिमेनंतर प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत.तात्पुरती अतिक्रमणे हटवून गरीब व्यावसायिकांवर अन्याय झाला मात्र पक्क्या बांधकामांना अभय का दिले ? विस्थापित झालेल्या व्यावसायिकांचे पुनर्वसन करणार का ? हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांची उपजीविका वाऱ्यावर सोडली का ? असे प्रश्न अतिक्रमण धारकांनी यावेळी उपस्थित केले.यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या व्यावसायिकांमध्ये संजय वाघ, प्रशांत घोगरे, संतोष राऊत, उमेश जोशी, रमेश कडू, मनिषा देशमुख, संतोष गायकवाड, राजेंद्र शिंदे यांचा समावेश आहे.

थर्टी फर्स्टच्या तयारीवर पाणी फिरले

३१ डिसेंबरच्या निमित्ताने आम्लेट पाव, वडापाव, पाणीपुरी विक्रेत्यांनी मोठ्या तयारीने व्यवसाय सुरू केला होता; मात्र अतिक्रमण हटवल्याने त्यांचे नुकसान झाले. संतोष लोहार, वैशाली पाटील, योगेश वाघ आणि भाऊराव गायकवाड यांचे व्यवसाय पूर्णतः विस्कळीत झाले आहेत.

प्रशासनाला आवाहन: समान न्याय हवा

प्रशासनाने गरीब व्यावसायिकांवर अन्याय टाळत पक्क्या अतिक्रमणांवरही कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.विस्थापित व्यावसायिकांचे पुनर्वसन करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सांगत आहेत.

रहदारीत सुधारणा, पण मालवाहू वाहनांचा प्रश्न कायम

रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे: मात्र चारचाकी पिकअप गाड्या, आयशर, टेम्पो यांसारखी वाहने रस्त्याच्या कडेला उभी राहतात.यामुळे वाहतूक कोंडी होते आणि अपघातांचा धोका वाढतो.ऊस वाहणाऱ्या बैलगाड्यांमुळेही अडथळा निर्माण होत आहे.

Sushant Kulkarni

Published by
Sushant Kulkarni

Recent Posts