अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर तालुक्यातील भोकर ग्रामपंचायतीची प्रजासत्ताकदिनी होत असलेली ग्रामसभा शासनाच्या जमावबंदी आदेशामुळे यावेळी ऑनलाईन होणार आहे.
गावच्या इतिहासात पहील्यांदाच ग्रामसभा ऑनलाईन होत असून ग्रामसभेत घरकुलाच्या ‘ड’ यादीचे वाचन होणार असल्याने या ग्रामसभेस विशेष महत्त्व आहे.
याबतची माहिती ग्रामविकास अधिकारी प्रदीप ढुमणे, सरपंच दत्तात्रय आहेर व उपसरपंच महेश पटारे यांनी दिली आहे. तर ऑनलाईन ग्रामसभेत मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपसरपंच महेश पटारे यांनी केले आहे.
कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांसह विविध कार्यकारी सोसायट्यांच्या वार्षीक सर्वसाधारण सभाही ऑनलाईन होत असताना आता गावोगावच्या ग्रामसभा ऑनलाईन होणार आहेत.
त्यानुसार भोकर ग्रामपंचायतीची प्रजासत्ताक दिनी म्हणजेच दि. 26 जानेवारी रोजी ग्रामसभा होत आहे. ग्रामसभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, जलजीवन मिशन जनजागृती, अपूर्ण घरकुले वेळेत पूर्ण करणे, माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबविणे, लसीकरणाबाबत जनजागृती करणे,
प्लास्टीक बंदीबाबत प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, विविध विकास कामांचा आढावा घेणे, घरकुलांची ‘ड’ यादीचे वाचन करणे, सामाजिक अंकेक्षण प्राप्त तक्रारी वाचन करणे,
मिशन वात्सल्य ग्रामस्तरीय समीती गठण करणे आदी विषयांबरोबर अध्यक्षांचे परवानगीने ऐन वेळेच्या विषयांवर चर्चा करणे आदी विषयांचा समावेश आहे.
दरम्यान या ग्रामसभेची लिंक सभेच्या एक तास अगोदर म्हणजेच सकाळी दहा वाजता गावातील विविध व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठविली जाणार असल्याचे उपसरपंच पटारे यांनी सांगितलेे.