Ahmednagar News : उपचाराच्या नावाखाली मनोविकलांग रुग्णाचे दोरीने हातपाय बांधून अघोरी पूजा मांडण्याचा प्रकार जागरुक ग्रामस्थ आणि अंनिसच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला.
एका मात्रिंकाच्या सल्ल्यानुसारवैद्यकीय उपचार करण्याऐवजी मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार कोपरगाव तालुक्यातील मोर्विस या गावात मंगळवारी हा प्रकार घडला. तेथे गोदावरी नदीच्या काठी एका मनोविकलांगाचे हातपाय पाय दोरीने बांधून त्याची अघोरी पूजा करण्याचा प्रयत्न सुरू होता.
पिडीत तरुण मानसिक आजाराने त्रस्त असल्याने नातेवाईकांनी त्याला अनेक देवस्थानी ठेवले. त्याच्या पायात लोखंडी बेडी घातली. शेवटी शिरवाडे येथील एका मांत्रिकाने त्यांना अघोरी पूजा करण्यास सांगितले. त्यासाठी गोदावरी नदीत आंघोळ घालून अघोरी पूजा करण्यात येत होती.
गावकऱ्यांना हे संशयास्पद वाटले. त्यामुळे मोर्विसचे पोलीस पाटील सोमनाथ पारखे व गावकरी गोरख कोकाटे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांना फोन करून या घटनेची माहिती दिली.
कृष्णा चांदगुडे यांनी हा जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा असल्याचे नातेवाईकांना सांगितले. पिडीतास मानसिक आजार असल्याने त्यास अशा अघोरी पूजेपेक्षा वैदयकीय उपचारांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर गावकऱ्यांनी हस्तक्षेप करून त्या युवकाची सुटका केली.