नेवासा

२० वे जागतिक मराठी संमेलन साताऱ्यात ; ज्येष्ठ साहित्यिक गडाखांची माहिती

७ जानेवारी २०२५ सोनई : जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २० वे जागतिक संमेलन शोध मराठी मनाचा येत्या (दि. १०) ते १२ जानेवारी दरम्यान सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात संपन्न होणार असल्याची माहिती जागतिक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, माजी खा. यशवंतराव गडाख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

याबाबत दिलेल्या पत्रकात गडाख यांनी म्हटले आहे की, २० व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १०) जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता खासदार शरद पवार यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली व ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. आशिष शेलार, कवी तसेच प्रसिद्ध चित्रपट निर्माता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असल्याचे सांगितले.

जागतिक मराठी परिषदेच्या माध्यमातून यापूर्वी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिकसह गोवा आदी विविध ठिकाणी संमेलने संपन्न झाल्याची माहिती गडाख यांनी देऊन यंदाचे २० वे जागतिक मराठी संमेलन साताऱ्यात आयोजित केल्याचे नमूद केले आहे.

संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी जागतिक मराठी भूषण पुरस्काराने उद्योजक हणमंतराव गायकवाड यांना तर ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांना जागतिक मराठी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती गडाख यांनी यावेळी दिली.

यावेळी शोध मराठी मनाचा या उपक्रमाद्वारे चित्रपट, कला, साहित्य, उद्योग, शिक्षण आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दुबई, अशा परदेशात भारताचे नाव उज्वल करणाऱ्या भारतीयांचा मुलाखतीतून जीवन प्रवास उलगडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तरुण तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, या प्रमुख हेतूने या मान्यवरांच्या प्रकट मुलाखती घेण्यात येणार असल्याने याचा सर्वांनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन गडाख यांनी केले आहे.या संमेलनाचा समारोप (दि. १२) जानेवारी रोजी राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई तसेच खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती गडाख यांनी दिली.जागतिक मराठी अकादमीचे संमेलन यशस्वी होण्यासाठी जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे व अकादमीचे सर्व सदस्य प्रयत्नशील आहे.

Sushant Kulkarni

Published by
Sushant Kulkarni

Recent Posts