अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Ahmednagar News : जबरी चोरी, दरोडा टाकून 172 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून ते सोनाराकडे विक्री करण्यासाठी निघालेल्या आरोपी सचिन सुरेश भोसले (वय 23, रा. नेवासा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
चोरीचे सोने विकत घेणारा आरोपी दादा संपत म्हस्के (रा. नेवासा) याला देखील यामध्ये आरोपी करून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्र परिषदेत दिली.
दरम्यान भोसलेचे साथीदार असिफ नासिर शेख (रा. वाळुंज, औरंगाबाद), गुलाब्या शिवाजी भोसले (रा. गोंडेगाव ता. नेवासा) हे पसार झाले आहेत.
आरोपींकडून सुमारे 9 लाख 12 हजार रूपये किंमतीचे 172 ग्रॅम सोन्याचे दागिणे हस्तगत केला आहे. श्रीरामपूर येथील दादासाहेब ज्ञानदेव मरकड (रा. खंडाळा ता. श्रीरामपूर) यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा मोठा मुद्देमाल लंपास केला होता.
या संदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला.
नेवासा परिसरामध्ये चोरी केलेले सोने काही चोरटे विकण्यासाठी घेवून येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.
त्या माहितीच्या आधारे खडका फाटा रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला. त्यावेळी एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून तीन चोरटे तेथे आले.
त्यातील सचिन भोसले याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या तर असिफ शेख, गुलाब्या भोसले हे पळून जाण्यात यशस्वी ठरले.
दरम्यान भोसलेवर आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे जामखेड, सोनई, श्रीरामपूर, नेवासा, पाथर्डी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल आहे.