७ जानेवारी २०२५ आश्वी : श्वानाचा पाठलाग करणे बिबट्याला चांगलेच महागात पडले आहे. श्वानाने चालाखी दाखवल्याने बिबट्या थेट शौचालयात जाऊन अडकला. त्यामुळे ‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’ याचा प्रत्यय आला. यानंतर शेतकऱ्याने बाहेर येत कडी लावली.ही घटना पिंपरी लौकी (ता. संगमनेर) येथे रविवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे.
पिंपरी लौकी परिसरातील देवीचा मळा येथे महादेव गिते यांच्या घरासमोर शौचालय आहे.पहाटे अडीच वाजेच्या सुमारास बिबट्याने श्वानाचा पाठलाग केला. मात्र, श्वानाने थेट शौचालयाच्या दिशेने धाव घेतली आणि काही क्षणातच श्वानाने हुलकावणी दिल्यामुळे बिबट्या थेट शौचालयात जाऊन अडकला.बिबट्याने बाहेर येण्याचा प्रयत्नही केला, परंतु शौचालयातून बाहेर पडता येत नसल्याने बिबट्याने दरवाजाला घडका दिल्या.
त्यामुळे जोराचा आवाज आल्याने महादेव गिते हे झोपेतून जागे झाले. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता, शौचालयात त्यांना बिबट्या अडकल्याचे दिसले. प्रसंगावधान राखत दरवाजाला बाहेरून कडी लावली.यानंतर गिते यांनी वन अधिकारी हरिचंद्र जोजार यांना माहिती दिली.
यावेळी भाग तीनचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष सांगळे, वनपरिमंडळ अधिकारी सुहास उपासनी यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमचे संतोष पारधी, गजानन पवार, वाहन चालक रामभाऊ वर्षे यांनी शौचालयामध्ये अडकलेल्या बिबट्याला मोठ्या शिताफीने पिंजऱ्यात जेरबंद केले.दरम्यान, बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यानंतर वनविभागाने बिबट्याला संगमनेर खुर्द रोपवाटिकेत नेले आहे.