१० जानेवारी २०२५ संगमनेर : नाशिक-पुणे औद्योगिक महामार्गाचे काम लवकरात लवकर तडीस नेण्यासह या महामार्गाच्या रेखांकनात संगमनेर शहरासाठी इंटरचेंज प्रस्तावित करावा व इतर मागण्यांच्या संदर्भात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.
संगमनेर शहरातील अतिक्रमणीत झोपडपट्टी भागात व भाड्याच्या घरात राहणाऱ्या २,५०० कुटुंबांना हक्काचं स्वमालकीचे घर मिळावे,यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्य व केंद्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करावी.
संगमनेर रस्ते विकास प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देऊन महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत प्रकल्पाच्या प्रस्तावित रकमेस मंजुरी द्यावी आणि शहराच्या विविध भागातील रस्त्यांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे.
संगमनेर शहरातील सर्वच निवासी अनधिकृत बांधकामांवरील १०० टक्के शास्ती कर माफ करून ही सर्व अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी ठोस योजना आणावी.संगमनेर शहराचं नाव ज्या ३ नद्यांच्या संगम ठिकाणावरून पडले, त्या म्हाळुंगी, आढळा आणि प्रवरा या नद्यांच्या सुधार प्रकल्पासाठी संगमनेर नगरपालिकेने तयार केलेल्या ३५० कोटींच्या प्रस्तावास मान्यता द्यावी,असेही या पत्रात म्हटले आहे.
शिंदे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद
हिवाळी अधिवेशनात हे मुद्दे उपस्थित करून शासनाचे याकडे लक्ष वेधले होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून पुन्हा एकदा या प्रमुख मागण्यांसह राज्यातील जनतेच्या हिताच्या इतरही प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा केली.माझ्या सर्व मागण्या ऐकून घेत त्याविषयी सकारात्मक पावलं उचलली जातील,असा विश्वास त्यांनी दिल्याचे आ. सत्यजित तांबे यांनी सांगितले.