संगमनेर

विकास नेमका कसा असतो, हे महसूल मंत्री विखे पाटील यांनी दाखवून दिले!आ. थोरातांवर डॉ. सुजय विखेंची नाव न घेता टीका

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे डॉ. सुजय विखे पाटील यांना पराभवाची चव चाखावी लागली व या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके विजयी झाले. तसे पाहायला गेले तर विखे पाटील यांचे राजकीय प्रस्थ असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात त्यांच्या राजकीय प्रस्थालाच  सुरुंग लावण्याचे काम निलेश लंके यांनी केले व याकरिता महाविकास आघाडीच्या अनेक मातब्बर नेत्यांनी देखील निलेश लंके यांना अप्रत्यक्षरीत्या मदत केली.

यामध्ये विखे यांचे राजकारणातील कट्टर विरोधक समजले जाणारे संगमनेरचे आ. बाळासाहेब थोरात यांनी देखील सुजय विखे यांच्या पराभावासाठी शक्य ती ताकद लावली व हाच लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील आता थेट थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघातूनच विधानसभेसाठीचा शड्डू ठोकणार असल्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत.

या दरम्यान त्यांनी आता संगमनेरातून देखील चाचपणी सुरू केले असून नुकतेच त्यांनी संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे महिला बचत गटांना जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पिठाच्या गिरणीचे वितरण केले व त्याप्रसंगी ते बोलत होते.

 काय म्हणाले माजी खा.डॉ. सुजय विखे पाटील

विकास काय असतो हे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोर्वे गावाला दाखवून दिले आहे. आता तालुक्यातील अन्य गावात युवकांच्या सहकार्याने विकासाचे परीवर्तन घडवायचे आहे. तालुक्याने ३५ वर्ष त्यांना दिली, पाच वर्ष माझ्या सारख्या युवकाला द्या, असे आवाहन माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

तालुक्यातील जोर्वे येथे महिला बचत गटांना जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पिठाच्या गिरणीचे वितरण माजी खा. डॉ. विखे पाटील यांच्या वि उपस्थितीत करण्यात आले. मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा प्रारंभ करण्यात आला. गावात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

गावातील भजनी मंडळांना साहित्याचे वाटप केले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. विखे पाटील म्हणाले की, २००९ पासून या गावात विकासाची प्रक्रीया सुरू झाली. या वर्षात ना. विखे पाटील यांनी उपलब्ध करून दिलेला निधी पाहाता यापुर्वी या भागातून आमदार निवडून कसे गेले, असा प्रश्न पडतो.

शिर्डी विधानसभा मतदार संघात जोर्वे गाव समाविष्ट झाल्यानंतर प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा लागला. कोव्हीड संकटात येथील लोकप्रतिनीधी कुठे होते. जेव्हा लोकांना औषधाची आणि रेमडिसिव्हरची गरज होती. तेव्हा फक्त विखे पाटील परीवार सर्वांच्या सोबत उभा राहिल्याचे सांगून जोर्वेत एक कोव्हीड सेंटर टाकू शकले नाहीत.

गावात पूर आला तेव्हा देखील गावाकडे पाठ फिरवाऱ्यांनी यांना लोकांनी पुरते ओळखले आहेत. जोर्वे गावात दशक्रीया विधीचा घाट बांधला. शेजारील गावाना इथे दशक्रीया विधीसाठी यावे लागते. पण काळजी करू नका, प्रत्येक गावात दशक्रीया विधी घाट बांधून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

राज्यातील महायुती सरकारने अनेक योजना महिला युवक शेतकरी यांच्यासाठी सुरू केल्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, योजना युती सरकारच्या आहेत. पण फोटो लावून पत्रक वाटायचे काम विरोधी मंडळी करीत असल्याने महायुतीचे काम विरोधकांना सुध्दा मान्य आहे. पण युती सरकारचे काम लोकांना सांगण्याची वेळ विरोधकांवर आल्याची खोचक टिका डॉ. विखे पाटील यांनी केली.

अनेक वर्षे तालुक्यात रोजगाराचा प्रश्न आहे. एक औद्योगिक वसाहत इथल्या लोकप्रतिनीधींना आणता आली नाही. साडेसात वर्षे मंत्री होते. पण ना. विखे पाटील यांनी शिर्डी मतदार संघातील औद्योगिक वसाहतीकरीता पाचशे एकर जागा मंजूर करून आणली,

आता उद्योग येण्यास प्रारंभ झाल्याची माहिती त्यांनी दिली. विकास प्रक्रीयेच्या जोरावरच जोर्वे ग्रामपंचायती मध्ये युवकांनी विजय घडवला. आता तालुक्यातील प्रत्येक गावातील युवकांच्या सहकार्याने असेच परीवर्तन आपल्याला घडवायचे आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts